दुबई : ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाने सुपर 12 टप्प्यातील गट-1 सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने राखून पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं 155 रन्सचं लक्ष्य कांगारूंनी 3 गडी गमावून पूर्ण केलं. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. डेव्हिड वॉर्नरने 42 चेंडूत 65 धावा केल्या.
डेव्हिड वॉर्नरने 42 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार लगावले. यावेळी कर्णधार अरोन फिंचसोबत पहिल्या विकेटसाठी 6.5 ओव्हर्समध्ये 70 रन्सची भागीदारी केली. फिंचने 23 चेंडूत 37 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. वॉर्नरने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली.
श्रीलंकेने दिलेले 155 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 18 चेंडू बाकी असताना 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा दोन सामन्यांतील हा दुसरा विजय आहे. कांगारू टीम पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका संघ एकाच सामन्यात एक विजय आणि एक पराभवासह चौथ्या स्थानावर आहे.
वानिंदू हसरंगाने 4 ओव्हर्समध्ये 22 रन्स देत 2 बळी घेतले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 11व्या ओव्हर्समध्ये 100 धावा पूर्ण केल्या, तर वॉर्नरने 12व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक रन घेऊन 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 14व्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन चौकार मारून रनरेट वाढवली.
दरम्यान सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाने बुधवारी आपल्या फॉर्मबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. डेव्हिड वॉर्नर म्हणाला होता की, "मला वाटतं की लोक माझ्या फॉर्मबद्दल बोलत आहेत जे खूप मजेदार आहे. मी याबाबत फार हसू येतं कारण मी क्वचितच क्रिकेट सामना खेळलोय."