टीम इंडियाला सापडला नवा सलामीवीर, 22 वर्षांचा खेळाडू पदार्पणातच चमकला

Team India New Opener : टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय.  यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. आता यात आणखी एका युवा खेळाडूची भर पडली आहे. पदार्पणातच या खेळाडू अर्धशतकी खेळी करत क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 18, 2023, 08:39 AM IST
टीम इंडियाला सापडला नवा सलामीवीर, 22 वर्षांचा खेळाडू पदार्पणातच चमकला title=

Team India New Opener : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 8 विकेटने धुळ चारली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पहिली फलंदाजी करणाऱ्या यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 116 धावांवर ऑलआऊट झाला. विजयाचं हे सोप आव्हान भारताने 2 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. भारताच्या अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) 5 तर आवेश खानने 4 विकेट घेतल्या. तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 52 धावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने 55 धावा केल्या. सलामीला आलेल्या साई सुदर्शनने (Sai Sudarshan) आपल्या पहिल्याच सामन्यात क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

कोण आहे साई सुदर्शन?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवीसय सामन्यात 22 वर्षांच्या साई सुदर्शनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 400 वा खेळाडू ठरला आहे. याआधी साई सुदर्शन भारताच्या अंडर-19 संघात खेळला आहे. विशेष म्हणजे साई सुदर्शनचे आई-वडिलही खेळाडू आहेत. वडीलांनी एशियन गेम्समध्ये सहभाग घेतला होता. तर आई उषा भारद्वाज तामिळनाडू संघातून व्हॉलीबॉल खेळल्या आहेत. 

स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघाकडून खेळणारा साई सुदर्शन सलामीाच फलंदाज आहे. 2022 च्या आयपीएल हंगामात साई सुदर्शन पहिल्यांदा चर्चेत आला. आयपीएमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने 5 सामन्यात 145 धावा केल्या. साई सुदर्शनच्या दमदार कामगिरीने गुजरात टायटन्सने त्याला 2023 हंगामासाठी रिटेन केलं. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत साई सुदर्शनने आयपीएलच्या सोळाव्या हंगामातही दमदारी कामिगीरी केली.

आयपीएलमध्ये चमकला
गुजरात टायटन्सकडून खेळताना साई सुदर्शनने दुसऱ्या हंगामात भारतीय क्रिकेट निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. 2023 आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळताना साई सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्सविरोधात 96 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्स संघ जेतेपद मिळवू शकला नाही पण साई सुदर्शनच्या झुंजार कामगिरीची जोरदार चर्चा झाली. या हंगामात साई सुदर्शनने 8 सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने 362 धावा केल्या. 

पाकिस्तानविरुद्ध शतकी कामगिरी
साई सुदर्शन याआधी भारताकडून इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत खेळला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध त्याने खणखणीत शतक ठोकलंय. एशिया कप स्पर्धेत त्यने 5 सामन्यात 220 धावा केल्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्येही साई सुदर्शनने सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला होता. टीएनपीएल 2023 मध्ये सुदर्शन सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. 

सलामीसाठो जोरदार चुरस
गेल्या तीन वर्षात टीम इंडियात तब्बल 33 सलामीवीर झालेत. यात  टी20 क्रिकेटमध्ये 14 खेळाडूंनी ओपनिंग केलीय. एकदिवसीय सामन्यात 11 खेळाडूंनी. तर कसोटी क्रिकेटमध्ये 7 खेळाडूंनी सलामीला येत फलंदाजी केलीय. आता यात साई सुदर्शनची भर पडली आहे. भविष्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये साई सुदर्शनचं ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलला तगडं आव्हान असणार आहे.