ऑस्ट्रेलियाचं एक पाऊल पुढे! भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा... या धोकादायक खेळाडूंना संधी

भारतात या वर्षांच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून एकदिवसीय विश्वषचक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्हीसाठ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन महिने आधीच संघाची घोषणा केली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 7, 2023, 01:03 PM IST
ऑस्ट्रेलियाचं एक पाऊल पुढे! भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा... या धोकादायक खेळाडूंना संधी title=

Australia Team for ODI WC 2023 : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं (ODI WC 2023) बिगुल वाजेल. तर 19 नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. स्पर्धेसाठी सर्वच दहा संघांची जोरदार तयारी सुरु आहे. संघबांधणीसाठी खेळाडूंची चाचणी घेतली जात आहे. पण यातही ऑस्ट्रेलियाने एक पालऊ पुढे टाकलं आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने 18 खेळाडूंच्या नावाची (Australia Squad) घोषणा केली आहे. संघात अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं आहे, आणि आता सहाव्यांदा चषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज झाला आहे. 

विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. 22 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार असून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाच्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. 

या खेळाडूला वगळलं
18 खेळाडूंच्या यादीतून ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू मार्नस लाबूशेनला (Marnus Labuschagne) वगळण्यात आलं आहे. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळण्याचं त्याचं स्वप्न भंगलं आहे. लाबूशेनची भारताविरुद्ध कामगिरी फारशी समाधानकारक नाही. लाबूशेनने भारताविरुध्दच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत केवळ 43 धावा केल्या होत्या. लाबूशेन ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 30 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 847 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 

18 खेळाडूंच्या नावाची घोषणा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 18 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. हा संघ केवळ विश्वचषक स्वर्धेसाठीच नाही तर त्या होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीदेखील असेल. या संघाची धुरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अनुभवी डेव्हिड वॉर्नर, स्टिम स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल अशा धोकादायक खेळा़डूंना संधी देण्यात आली आहे. 

2 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया भारतात
विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून 22 सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होईल. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल. ऑस्ट्रेलियाच्या मिशन ऑलिम्पिकला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियाचा पहिलाच सामना यजमान भारताविरुद्ध रंगणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, सेन एबॉट, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, आरोन हार्डी, जॉस हेजलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मार्कस स्टॉयनिश, एडम झम्पा, ट्रेविस हेड