Video Suryakumar Yadav Runout: भारताचा मिस्टर 360 डिग्री खेळाडू अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवला सध्या टी-20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. रविवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात गयानामधील प्रोविडेन्स स्टेडियमवरही भारताचा हा धडाकेबाज फलंदाज अपयशी ठरला. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव तंबूत परतला. अर्थात यासाठी कारणीभूत ठरला तो काइल मायर्सने केलेला भन्नाट थ्रो. काइलने चेंडू हातात आल्यानंतर काही क्षणात तो स्टम्पच्या दिशेनं फेकला अन् सूर्यकुमार क्रिजमध्ये पोहोचण्याआधीच स्टॅम्पला आदळला.
भारताचा सालामीवीर शुभमन गिल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव सामन्यातील तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाजीसाठी मैदानात आला. सूर्याने अल्जारी जोसफच्या शेवटच्या चेंडूवर ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र पायाला लागू गेल्याने लेग बायची एक धाव सूर्यकुमारला देण्यात आली. त्यानंतर भारतीय डावातील चौथी ओव्हरमध्ये विंडीजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने टाकली. मॅकॉयच्या या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर सूर्यकुमारला एकही धाव घेता आली नाही. पुढच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ईशान किशनने मॅकॉयचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने ढकलला. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या उद्देशाने ईशान धावला. मात्र ईशानच्या कॉलवर स्ट्राइकर्स एण्डकडे धावणारा सूर्यकुमार यादव क्रिजमध्ये पोहचण्याआधीच काइल मायर्सने फेकलेल्या चेंडूने स्टम्प्सचा वेध घेतला होता. मायर्सचा डायरेक्ट थ्रो अगदी एखाद्या रॉकेटप्रमाणे होता.
Magical Mayers hits the Bulls Eye, once again
..#INDvWIAdFreeonFanCode #WIvIND pic.twitter.com/U117vZk2mz
— FanCode (@FanCode) August 6, 2023
धावबाद झाल्यानंतर सूर्याला आपण ही धाव घेण्याचा प्रयत्न करायला नको होतं असं वाटलं. तो जड पावलांनी पव्हेलियनकडे परतला. सूर्यकुमारला 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव करता आली. या टी-20 मालिकेमध्ये सूर्याने पहिल्या सामन्यात 21 धावांची खेळी केली होती. या मालिकेत सूर्याला अजून तरी नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. टी-20 मध्येही तो अपयशीच ठरला. केवळ सूर्यकुमार यादवच नाही तर तिलक वर्मा वगळता भारताचे सर्वच फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी-20 अपयशी ठरले आहेत. दुसरा सामना वेस्ट इंडीजने पूरनच्या फलंदाजीच्या जोरावर 2 विकेट्स राखून जिंकला.
20 वर्षीय तिलक वर्माने या मालिकेपासून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने पहिल्या टी-20 मध्ये 39 धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात 51 धावा केल्या. म्हणजेच त्याने 2 सामन्यांमध्ये 90 धावा केल्या. अन्य भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर इतर कोणालाही 50 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. यावरुन भारतीय फलंदाजांच्या कामगिरीचा अंदाज बांधचा येतो. पंड्याने 2 सामन्यांमध्ये 43, ईशान किशनने 2 सामन्यांत 33, सूर्यकुमार यादवने 2 सामन्यांत 22 आणि शुभमन गिलने 2 सामन्यांत 10 धावा केल्या. दुसरीकडे भारतीय संघातील तळाचे फलंदाज अर्शदीप सिंगने 2 सामन्यात 18 आणि अक्षर पटेलने 2 सामन्यात 27 धावा केल्या. संजू सॅमसनलाही फारशी चमक दाखवता आलेली नसून त्याने 2 सामन्यात 19 धावा केल्या आहेत.