टीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसऱ्या कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 1, 2024, 08:04 PM IST
टीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर? title=

IND vs ENG Test Series: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात इंग्लंडशी दोन हात करतोय. भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका (India vs England Test Series) खेळवली जातेय. यातला दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये (Visakhapatnam) रंगणार आहे  भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी (Team India) एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता असतानाच आणखी एक खेळाडू संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाहीए. 

टीम इंडियाचं ग्रहण सुटेना
ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हॅमस्ट्रिंगमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातू बाहेर पडला आहे. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी जडेजाला 4 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढच्या तीनही कसोटी तो खेळू शकेल की नाही याबाबत साशंकता आहे. हे कमी की काय आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीदेखील (Mohammad Shami) संपूर्ण कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार शमी अद्याप पूर्ण पणे फिट झालेला नाही. मोहम्मद शमी सध्या लंडनमध्ये असून त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. 

मोहम्मद शमीला पूर्णपणे बरं होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात तो खेळू शकणार नाही. IPL 2024 मध्येच शमी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

केएल राहुल कधी परतणार?
टीम इंडियाचा फलंदाज आणि  विकेटकीपर केएल राहुलही पायाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीए. 2023 मध्ये त्याच्या मांडीवर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हे दुखणं पुन्हा सुरु झाल्याने राहुलला विश्रांती देण्यात आली आहे. पण ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचं सांगितलं जातंय. 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी केएल राहुल संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 

हे चार प्रमुख खेळाडू संघातून बाहेर
चार प्रमुख खेळाडूंशिवाय रोहित शर्माला युवा संघ घेऊन बलाढ्य इंग्लंडविरोधात मैदानात उतरावं लागणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे ब्रेक घेतला आहे. रवींद्र जडेजा पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. केएल राहुला मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलाय. तर मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीवर लंडनमध्ये उपचार घेतोय. 

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर, सौरभ कुमार