India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये (Visakhapatnam) खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 28 धावांनी मात केली. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड संघाने प्लेईंग इलेव्हनची (England Playing XI) घोषणा केली आहे. या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जॅक लीचच्या जागी मिस्ट्री स्पिनर शोएब बशीरला (Shoaib Bashir) संघात संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात जॅक लीचच्या गुढघ्याला दुखापत झाली होती. याशिवाय इंग्लंडचा हुकमी वेगवान गोलंदाज जेम्स एंडरनसचाही (James Anderson) प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीसाठ तीन फिरकी गोलंदाज आणि एका वेगवान गोलंदाजसह इंग्लंड मैदानात उतरणार आहे.
असा असेल दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ
जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स एंडरसन.
एंडरसनकडे इतिहास रचण्याची संधी
विशाखापट्टनम कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसनला इतिहास रचण्याची संधी आहे. एंडरसनने आतापर्यंत 183 कसोटी सामन्यात एकूण 690 विकेट घेतल्या आहेत. अशात 700 विकेटचा टप्पा पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. जेम्स एंडरसनचा हा सातवा भारत दौरा आहे. एंडरसनने भारताविरुद्ध 35 कसोटी सामन्यात 139 विकेट घेतल्या आहेत. यात एंडरसनने सहा वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी बजावली आहे. 2012 च्या भारत दौऱ्यात एंडरसनने ऐतिहासिक कामगिरी केली होती. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडने 2-1 असं पराभूत केल होतं. या मालिकेत जेम्स एंडरसनने 12 विकेट घेतल्या होत्या. भारतात खेळलेल्या 13 कसोटी सामन्यात एंडरसनने 34 विकेट घेतल्या आहेत.
इंग्लंडचा मिस्ट्री फिरकी गोलंदाज
दुसऱ्या कसोटी फिरकी गोलंदाज शोएब बशीरला संधी देण्यात आली आहे. शोएब बशीर हा मुळचा पाकिस्तानचा असून तो ऑफ स्पिनर आहे. या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यापूर्वी बशीरला विजा मिळाला नव्हता. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. विजात काही गडबड असल्याने त्याला युएईमध्येच थांबावं लागलं होतं. बशीरचा जन्म इंग्लंडच्या सॉमरसेटमध्ये झालाय. त्याचे आई-वडील पाकिस्तानी आहेत.
टीम इंडियाचं प्लेईंग इलेव्हन कधी?
विशाखापट्टनम कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हन जाहीर केलं असलं तरी यजमान टीम इंडियाने आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही. दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होतील. स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि फलंदाज केएल राहुल दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे दोघांनीही माघार घेतली आहे. जडेजा आणि राहुलच्या जागी दुसऱ्या कसोटीत सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमारला संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधा), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर, सौरभ कुमार