ठरलं! राहुल द्रविडला रोजगार मिळणार, आयपीएलमध्ये KKR नाही तर 'या' संघांच्या प्रशिक्षकपदी निवड होणार

Rahul Dravid : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. यानंतर बोलताना आता आपण बरोजगार असल्याचं म्हटलं होतं. पण आता लवकरच राहुल द्रविड यांना नवा रोजगार मिळणार आहे. याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 23, 2024, 04:57 PM IST
ठरलं! राहुल द्रविडला रोजगार मिळणार, आयपीएलमध्ये KKR नाही तर 'या' संघांच्या प्रशिक्षकपदी निवड होणार title=

Rahul Dravid : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपला. यानंतर बोलताना आता आपण बरोजगार असल्याचं म्हटलं होतं. पण आता लवकरच राहुल द्रविड यांना नवा रोजगार मिळणार आहे. राहुल द्रविड आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) प्रशिक्षक बनणार असी चर्चा रंगली होती. पण या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता नव्या माहितीनुसार राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणार असल्याचं समोर आलं आहे. 

राजस्थान रॉयल्सला करणार मार्गदर्शन?
भारतीय क्रिकेट संघासोबत राहुल द्रविड यांनी तीन वर्ष प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. टी20 वर्ल्ड कपपर्यंत तो वाढवण्यात आला होता. पण यानंतर त्यांनी पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला नाही. त्यांच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली. आता राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सबरोबर काम करणार असल्याचं बोललं जातंय. रिपोर्टनुसार राहुल द्रविड आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनादरम्यान यासंदर्भात बातचित सुरु आहे.

आयपीएलमध्ये राहुल द्रविड
आपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सबरोबर काम करण्याची ही राहुल द्रविड यांची पहिलीच वेळ नाही. याआधी राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्वही केलं आहे. 2012 मध्ये राजस्थान रॉयल्सची धुरा राहुल द्रविड यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. यानंतर 40 सामन्यात राहुल द्रविड यांनी आरआरची कमान सांभाळली. यापैकी 23 सामन्यात राहुल द्रविडने राजस्थानला विजय मिळवून दिला. कर्णधारपद सोडल्यानंतर राहुल द्रविड यांनी 2014 आणि 2015 आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा मेंटोर म्हणून काम केलं. 

यानंतर राहुल द्रविड यांच्याकडे बीसीसीआयने पहिली मोठी जबाबदारी सोपवली. राहुल द्रविड यांना अंडर-19 आणि इंडिया- A संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं. 

प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ
राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर-19 टीम 2018 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स बनली. यानंतर बंगळुरुमधल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या क्रिकेट ऑपरेशन हेडपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2021 मध्ये त्यांना टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं. त्यानंतर तीन वर्ष त्यांनी जबाबादारी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 

आता राजस्थान रॉयल्सही राहुल द्रविड यांच्याकडून हीच अपेक्षा करतंय. 2008 नंतर राजस्थान रॉयल्सला आयपीएलचं जेतेपद पटकावता आलेलं नाही. आता राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2025 मध्ये जेतपदाची ट्ऱॉफी उंचवण्याचं स्वप्न राजस्थान रॉयल्स पाहातंय.