India vs Sri Lanka, 2nd ODI : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला (Team India) लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिली फलंदाजी करताना श्रीलंकेने 9 विकेट गमावत 240 धावा केल्या. विजयाचं हे सोप आव्हान समोर ठेऊन खेळणारी टीम इंडिया अवघ्या 208 धावांवर ऑलआऊट झाली. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल सारखे स्टार फलंदाज संघात असतानाही टीम इंडियाला 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेचा युवा फिरकी गोलंदाज जेफरी वांडरसने (Jeffrey Vandersay) एकट्याने टीम इंडियाला भगदाड पाडलं. त्याने 6 विकेट घेतल्या.
टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवाचं कारण
टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांनी पराभवाला खेळपट्टी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमच्या खेळपट्टीवर चेंडू प्रमाणापेक्षा जास्त वळत होता, असं अभिषेक नायरनं म्हटलंय. पण यामुळे परदेशी खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीचा कमकुतपण पुन्हा एकदा समोर आला आहे. जेफरी वांडरसची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना कळलीच नाही.
फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीमुळे सामना कधीही पलटू शकतो हे आम्हाला माहीत होतं, असंही अभिषेक नायर यांनी सांगितलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी तब्बल 97 धावांची भागिदारी केली. पण यानंतर पुढचे 9 फलंदाज अवघ्या 111 धावांमध्ये माघारी परतले. यातल्या सहा फलंदाजांना जेफरी वांडरसने बाद केलं. तर तीन फलंदाजांना फिरकी गोलंदाज चरिथा असलंकाने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. म्हणजे टीम इंडियाचे नऊ फलंदाज फिरकीसमोर गडगडले.
पहिल्या सामन्यातही 230 धावा करताना टीम इंडियाच्या फलंदाजांना नाकेनऊ आले होते. विजयसाठी एका धावेची गरज असताना लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी सलग दोन विकेट घेत सामना टाय केला. यावर बोलताना अभिषेक नायर यांनी चेंडू जूना झाल्यावर धावा करताना अडचणी येतात, विशेषत: पन्नास षटकांच्या सामन्यात दुसरी फंलदाजी करताना आव्हान गाठणं कठिण असल्याचं नायरने म्हटलंय.
फलंदाजी क्रमवारीतले बदल नडले?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमवारीतही बदल करण्यात आले होते. मधल्या फळीत शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं तर श्रेयस अय्यरला सहाव्या आणि केएल राहुलला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवण्यात आलं. पण फलंदाजीतला हा बदल टीम इंडियाला मानवला नाही. शिवम दुबे आणि केअल राहुल शुन्याव बाद झाले. तर अय्यरला केवळ 7 धावा करता आल्या. पण फलंदाजीतल्या बदलामुळे टीम टीम इंडियाला फारसा फरक पडला नसल्याचं अभिषेक नायर यांनी म्हटलं आहे.
एकदिवसीय मालिका बरोबरीत सोडवणार?
भारत आणि श्रीलंकादरम्यानचा तिसरा एकदिवसीय सामना सात ऑगस्टला कोलंबोमध्येच खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी टीम इंडियासमोर आहे.