World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (WC 2023) सज्ज झाली आहे. पण त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. पंजाबमधल्या मोहाली क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात राहुल द्रविड यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या तयारीबाबत माहिती दिली.
द्रविडचा या खेळाडूवर विश्वास
राहुल द्रविड यांनी सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. सूर्या टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्याला अद्याप सूर गवसलेला नाही. पण यानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सूर्यकुमारवर विश्वास व्यक्त केला आहे. विश्वचषक स्पर्धेतही सूर्याची जागा निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये फ्लॉप
सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारशी समाधानकार कामगिरी करता आलेली नाही. सूर्या टीम इंडियासाठी आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 24.40 अॅव्हरेजने केवळ 537 धावा केल्या आहेत. यात केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने 14 मार्च 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध तो पहिला एकदिवसीय सामना खेळला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार संधी देण्यात येईल. त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं राहुल द्रविड यांनी म्हटलंय. सूर्यकुमारकडे खेळण्याची वेगळी कला आहे असंही द्रविड यांनी सांगितलं.
28 तारखेला संघ बदल
एकदिवसीय विश्वचषकासाठी संघात बदल करण्याची 28 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. पण राहुल द्रविड यांच्या म्हणण्यानुसार सूर्यकुमार यादवची वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातही जागा पक्की आहे. सूर्यकुमारकडे सामना फिरवण्याची ताकद असल्याचंही द्रविड यांनी म्हटलंय.
एकदिवीय क्रिकेटमध्ये खराब रेकॉर्ड
यावर्षात सूर्यकुमार यादव एकूण 11 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने केवळ 153 धावा केल्या आहेत. सलग तीन सामन्यात शुन्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर आहे. सूर्या क्रिकेट जगतातला पहिला खेळाडू आहे जो सलग तीन सामन्यात गोल्डन डकवर म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा संघ (पहिल्या दोन सामन्यांसाठी)
केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
तिसऱ्या सामन्यासाठी भारती संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
भारत-ऑस्ट्रेलिया वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना - 22 सप्टेंबर - मोहाली
दूसरा एकदिवसीय सामना - 24 सप्टेंबर - इंदौर
तीसराएकदिवसीय सामना - 27 सप्टेंबर- राजकोट