IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची Playing XI ठरली, या खेळाडूंना संधी

India vs Australia, 1st ODI: एशिया कप स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया आता वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 21, 2023, 05:11 PM IST
 IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची Playing XI ठरली, या खेळाडूंना संधी title=

India vs Australia, 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना शुक्रवारी म्हणजे 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून पंजाबच्या मोहाली स्टेडिअमवर (Mohali Stadium) हा सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाच्या (Team India) कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आली आहे. तर रविंद्र जडेजाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी (ODI WC 2023) होणारी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. 

पहिल्या वन डेसाठी या खेळाडूंना संधी
भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू कर्णधार होरित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला पहिल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे हे या मालिकेत स्पष्ट होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत श्रेयस अय्यरला आपला फिटनेस दाखवावा लागणार आहे, तर सूर्यकुमार यादवला एकदिवसीय क्रिकेटमधील आपला रेकॉर्ड सुधारण्याची संधी असेल. 

28 वर्षांचा श्रेयस अय्यर गेल्या सहा महिन्यात क्रिकेटपेक्षा दुखापतीचा जास्त सामना करतोय. दुखापतीतून सावरल्यानंतर एशिया कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अय्यरला पाठदुखीमुळे पुन्हा बाहेर बसावं लागलं. त्यामुळे वर्ल्ड कपविरुद्धच्या भारतीय संघात श्रेयस अय्यरच्या निवडीवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज म्हणून श्रेयस अय्यरकडे पाहिलं जातं. 

सूर्यकुमारला आणखी किती संधी?
टी20 मध्ये आक्रमक फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र अद्याप स्थिरावू शकलेला नाही. सूर्यकुमार आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळलाय, यात त्याचा अॅव्हरेज केवळ 25 इतकाच आहे त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ त्याला अद्याप करता आलेला नाही. विश्वचषकाच्या 15 खेळाडूंच्या संघात सूर्यकुमारला संधी देण्यात आली आहे. पण अंतिम अकरामध्ये खेळायचं असल्यास सुर्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. 

दुसरीकडे ऑलराऊंडर अक्षर पटेल जखमी झाल्यामुळे 37 वर्षांच्या आर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. वर्ल्ड कपपूर्वी अक्षर पटेल दुखापतीतून सावरला नाही तर अश्विनला वर्ल्डकप संघातही संधी मिळण्याची शक्यता आहे. पण संघात संधी मिळण्यासाठी अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये स्पर्धा असणार आहे. यातही अनुभव आणि महत्त्वाची स्पर्धा लक्षात घेता आर अश्विनचं पारडं जड आहे. कुलदीप यादव आणि अक्षरच्या गैरहजेरीत अश्विनला स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. 

ईशान आणि गिल सलामीला
कर्णधार रोहित शर्मा संघात नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय डावाची सुरुवात शुभमन गिल आणि ईशान किशन करतील. तर विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी मिळेल. टीम इंडियात एकाही वेगवान गोलंदाजाला आराम देण्यात आलेला नाही. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला एका सामन्यासाठी आराम दिला जाऊ शकतो. 

ऑस्ट्रेलियाला तयारीची संधी
दुसरीकडे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी देखील भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका संघाची तयारी तपासणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. नुकतीच झालेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाला 2-3 अशी गमवावी लागली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध पूर्ण ताकदिनिशी उतरणार आहे.