टीम इंडियात मोठी घडामोड, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा रोल बदलणार?

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानचा पहिला टी20 सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडमोड घडली आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीचा संघातील बोल बदलण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 10, 2024, 05:38 PM IST
टीम इंडियात मोठी घडामोड, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा रोल बदलणार? title=

India vs Afghanistan 1st T20: भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान पहिल्यांदाच टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही संघांदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून यातला पहालि सामना गुरुवारी म्हणजे 11 जानेवारीला मोहाली स्टेडिअममध्ये (Mohali Stadium) खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचं (Virat Kohli) टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. 2022 मध्ये टी20 विश्वचषकानंतर म्हणजे तब्बल 14 महिने रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 क्रिकेटपासून दूर आहेत. पण आता अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी रोहित-विराटचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

टी20 विश्वचषकाच्यादृष्टीने तयारी
यावर्षातील जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. यादृष्टीने बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाची बांधणी करत आहे. याचाच एक भाग म्हणून रोहित शर्मा-विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्ड विराट कोहलीची संघातील भूमिका बदलण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविवड आणि निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगारकर यांनी कोहलीच्या नव्या भूमिकेबाबत चर्चा केली. केपटाऊनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या कसोटी सामन्यानंतर ही बातचीत झाली. 

विराट कोहलीकडे नवी जबाबदारी
राहुल द्रविड-अजीत आगरकर यांनी केलेल्या ठरावानुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात विराट कोहली सलामीवीराच्या भूमिकेत दिसू शकतो. म्हणजे रोहित शर्माबरोबर विराट कोहली भारतीय डावाची सुरुवात करु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिलला संधी मिळू शकते. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

विराट कोहलीची टी20 कारकिर्द
विराट कोहलीची आतपर्यंतच टी20 कारकिर्द दमदार आहे. विराट कोहली टीम इंडियासाठी आतापर्यंत 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 4008 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये विराटच्या खात्यात एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 122 आहे. इतकंच काय तर टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 4 विकेटही जमा आहेत. 

रोहित शर्मा-विराट कोहली
रोहित-विराट जोडीने तब्बल 29 टी20 सामन्यात भारतीय डावाची सुरुवात केली आहे. या जोडीने 40 च्या अॅव्हरेजने तब्बल 1160 धावा केल्या आहेत. 138 धावांची सर्वोत्तम भागिदारीही त्यांच्या नावावर आहे. 

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, अवेश खान आणि मुकेश कुमार.