कोरोना : पुढचे ९० दिवस आव्हानात्मक, आरोग्य मंत्रालयाने वाढवली चिंता

भारतात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या संकटातच आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.

Updated: Sep 22, 2020, 09:27 PM IST
कोरोना : पुढचे ९० दिवस आव्हानात्मक, आरोग्य मंत्रालयाने वाढवली चिंता title=

नवी दिल्ली : भारतात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या संकटातच आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. पुढचे तीन महिने आव्हानात्मक असू शकतात, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. थंडीमध्ये कोरोना व्हायरस आणखी घातक होऊ शकतो, एवढच नाही तर देशात सण सुरू होत आहेत, त्यामुळे संक्रमण आणखी जलद वाढू शकतं, अशी भीती आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. 

या राज्यात कोरोनाचं संक्रमण जलद 

नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर वीके पॉल म्हणाले, कोरोनाचा प्रसार काही राज्यांमध्ये खूपच जलद होत आहे. देशाच्या ७ राज्यांमध्ये कोरोना जास्त प्रमाणात वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. 

पंतप्रधान घेणार बैठक

केंद्र सरकार राज्यांमधल्या परिस्थितीबाबत माहिती घेत आहे आणि गरजेची मेडिकल इक्विपमेंट्स क्लबही करत आहेत, असं राजेश भुषण यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी या ७ राज्यांसोबत समीक्षा बैठक घेणार आहेत. कोरोना संक्रमण अधिक असणाऱ्या या राज्यांसाठी काय पावलं उचलायची? याचे निर्देशही केंद्र सरकार देऊ शकतं.

एकीकडे थंडीत कोरोना संक्रमणाबाबत आरोग्य मंत्रालयाने ही भीती व्यक्त केली असली तरी देशात रुग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात ४४.९ लाख कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. जगभरात रुग्ण बरे होण्याची ही संख्या सर्वाधिक आहे. आजच्या एका दिवसात १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी सांगितलं.

जगात एकूण कोरोना रुग्णांपैकी २२.४ टक्के अमेरिकेत, १७.७ टक्के भारतात, १४.५ टक्के ब्राझीलमध्ये आहेत. संपूर्ण जगभरात भारताचा रिकव्हरी रेट १९.५ टक्के आहे. तर अमेरिकेचा १८.६ टक्के आणि ब्राझीलचा १६.८ टक्के आहे. मागच्या ४ दिवसांमध्ये नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. 

आम्ही कोरोना टेस्टची संख्या वाढवत आहोत. ७ जुलैपर्यंत १ कोटी कोरोना टेस्ट, तर ३ ऑगस्टपर्यंत ३ कोटी कोरोना टेस्ट झाल्या. यात २७ दिवसांचा फरक आहे. ५ ते ६ कोटी टेस्टमध्ये ९ दिवस लागले, असं सचिव राजेश भुषण म्हणाले.