मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचा फटका आता क्रिकेट सामन्यांना बसत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामने प्रेक्षकांशिवाय मोकळ्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआयने याबाबतची घोषणा केली आहे.
याशिवाय सध्या राजकोटमध्ये सुरु असलेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा उद्या शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे.
The final day's play of Ranji Trophy match between Bengal and Saurashtra in Rajkot to be played in empty stadium
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2020
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात झाली. धर्मशाळा इथं आजचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना १५ मार्चला लखनौ इथं आणि तिसरा सामना १८ मार्चला कोलकात्याच्या इडन गार्डनवर खेळवला जाणार होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गर्दी टाळण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. त्यामुळे पुढचे दोनही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात आम्ही आहोत. या दोन्ही मंत्रालयांसोबत चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.
आयपीएल स्पर्धेला देखिल कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची चिन्हं असून प्रेक्षकांशिवाय सामने खेळवणं किंवा स्पर्धा पुढे ढकलणं असे पर्याय सरकारनं सुचवले आहेत. त्यामुळे आयपीएलबाबतही काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता आहे.