मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसांना सरकारने स्थगिती दिली आहे. व्हिसांना स्थगिती दिल्यामुळे आयपीएलमधल्या परदेशी खेळाडूंचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू सहभागी होऊ शकतात.
केंद्र सरकारने फक्त पर्यटक व्हिसाला स्थगिती दिली आहे. डिप्लोमॅटिक व्हिसा, वर्क व्हिसा, वर्क व्हिसा आणि इतर ऑफिशियल व्हिसांना यातून वगळण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेले परदेशी खेळाडू वर्क व्हिसा घेऊन भारतामध्ये येतात.
भारतामध्ये खेळत असताना परदेशी खेळाडूंना पॅनकार्ड दिलं जातं, कारण त्यांना मिळणाऱ्या मानधनावर कर लावला जातो. आयपीएलसाठी खेळाडूशी करार झाल्यानंतर दोन पत्र काढली जातात.
जर १५ ते १६ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात आयपीएल खेळण्यासाठी येणार असतील तर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय उच्चायुक्तालयाला आयपीएल एक पत्र देतं. खेळाडूंशी करार झाल्यामुळे त्यांना भारतात येण्यासाठी वर्क व्हिसा द्यावा, अशी विनंती या पत्रात केली जाते. याच पद्धतीने फ्रॅन्चायजीदेखील एक पत्र देतं, या पत्रात खेळाडूला मिळणाऱ्या मानधनाची रक्कमही लिहिली जाते.
खेळाडूंना व्हिसा मिळण्यात फार अडचण येणार नसली, तरी त्यांच्या कुटुंबाला मात्र व्हिसा मिळणं जवळपास अशक्य आहे. आयपीएलमध्ये बऱ्याच वेळा परदेशी खेळाडूंची पत्नी आणि मुलं भारतात येतात. या कुटुंबाना पर्यटक व्हिसा दिला जातो, त्यामुळे १५ एप्रिलपर्यंततरी खेळाडूंच्या कुटुंबाला भारतात येता येणार नाही.