Ganesh Naik Comment On Ex CM Eknath Shinde: नवी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणामधील काही मुद्दे चर्चेत असतानाच गणेश नाईकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गणेश नाईक यांनी आता या विधानावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
"काहीजण हतबल असतात त्या परिसरात जे घडत ते बघण्यापलीकडे त्यांच्याकडे काही नाही. पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र निर्माण करु, असं गणेश नाईक म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "सर्वच मंत्रिमंडळाला कळून चुकलंय आता एकही चूक करायची नाही," असंही गणेश नाईक म्हणाले. "आपण प्रॉपर माणूस नवी मुंबईसाठी निवडलाय," असंही गणेश नाईक म्हणाले. तसेच आपल्या भाषणात पुढे बोलताना गणेश नाईक यांनी, "एकनाथ शिंदे यांच्या कालखंडत त्यांची इच्छा नसताना काही गोष्टी घडल्यात. ती परिस्थिती आता बदललेय. आता तिघांनी निश्चय केला आहे. महाराष्ट्रचे अर्थकारण, शिक्षण, आरोग्य सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहिलं," असं म्हटलं. विशेष म्हणेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंचावर असतानाच त्यांनी हे विधान केलं.
"सगळे तुमच्या इच्छेप्रमाणे काम करतील असे होत नाही. एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकतो हे आयुक्तांनी दाखवलं आहे. विकसित देशाची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न केला," असंही गणेश नाईक म्हणाले. गणेश नाईकांच्या या विधानसंदर्भात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी, "मला त्याच्यातलं काही माहीत नाही. हा शेवटी ठाणे जिल्ह्यातला विषय आहे. त्या बाबतीमध्ये स्थानिक लोकच सांगू शकतील," असं म्हणत गणेश नाईकांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील राजकीय मतभेद हे सर्वश्रूत असल्याने अनेकांनी या विधानावरुन तर्कवितर्क मांडण्यास सुरुवात केली.
मात्र गणेश नाईक यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय याबद्दल चर्चांना उधाण आलेलं असतानाच त्यावर नागपूरमध्ये पहाणी दौऱ्यासाठी पोहोचलेल्या गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "नवी मुंबई येथे एकनाथ शिंदेची इच्छा नसताना काही बाबी घडल्या. सर्व्हिस रोडसाठी घातक असे भूखंड दिले. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्या गोष्टीचा निषेध केला. हे भूखंड दुसरीकडे द्या," असं आपल्याला म्हणायचं होतं अशी प्रतिक्रिया गणेश नाईकांनी नोंदवली आहे.