मुंबई : टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची जोडी वेगळी झाली. या दोघांची जागा आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या दोघांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. यातच आता कर्णधार रोहितने द्रविडसह मिळून काम करण्याबाबतीत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Captain Rohit Sharma wants to build a close relationship with the players of Team India with the help of coach Rahul Dravid)
रोहितला टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये घट्ट नातं तयार करायचं आहे. यासाठी द्रविड मदत करेल अशी रोहितला आशा आहे. आपल्याबाबत बाहेर काय म्हटलं जातंय, याकडे लक्ष द्यायला नको. त्याऐवजी आपण टीममधील खेळाडू एकमेकांबाबत काय विचार करतो, हे फार महत्त्वाचं असल्याचं रोहितला वाटतं.
रोहित काय म्हणाला?
"खेळाडूंमध्ये घट्ट नातं निर्माण करु इच्छितो. ज्यामुळे आम्हाला आमचं अपेक्षित लक्ष्य गाठण्यात मदत मिळेल. आणि द्रविड भाई आम्हाला यात निश्चितच मदत करेल. त्यामुळे आम्ही असं सर्व करायला तयार आहोत.", असं रोहितने म्हंटलं. रोहित बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
"देशासाठी खेळताना फार दबाव असतो. लोकं अनेक मुद्द्यांवरुन सकारात्मक आणि नकारात्मक बोलत असतात. क्रिकेटर म्हणून वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी हे महत्त्वाचं नाही. आपल्या कामावर लक्ष देणं ही माझी प्राथमिकता आहे. लोकांनी काय बोलावं, हे आपल्या हातात नसतं", असंही रोहितने स्पष्ट केलं.
ज्या गोष्टींचं आपल्या हातात नियंत्रण आहे त्यावर नियंत्रण करा. हाच मंत्र टीम इंडियाच्या माजी कर्णधारांसाठी राहिला आहे. रोहितलाही या मंत्रावर आक्षेप नाही.
"जेव्हा आपण मोठ्या स्पर्धेत खेळतो, तेव्हा अधिक प्रमाणात चर्चा होते, असं संघाला वाटतं. मात्र आपण त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करायचंय जे आपण ठरवलंय. मी नेहमी हेच म्हणत आलोय आणि पुढेही हेच म्हणत राहिन", असंही रोहित म्हणाला.