Wicket गेली पण कोणालाच कळलं नाही! तो खेळत राहिला अन् संघ जिंकला; पाहा Video

Batter In TNPL Watch Viral Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आळस आणि पंचांचा हलगर्जीपणा या दोन गोष्टींमुळे हा प्रकार घडल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. तुम्हीच पाहा नक्की घडलं काय

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2023, 03:30 PM IST
Wicket गेली पण कोणालाच कळलं नाही! तो खेळत राहिला अन् संघ जिंकला; पाहा Video title=
रिप्ले पाहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्यांची चूक कळली

Batter In TNPL Watch Viral Video: मागील काही काळापासून क्रिकेटमध्ये रिव्ह्यू म्हणजेच डीआरएसचा वापर वाढल्याचं दिसतं. अनेकदा डीआरएस घेतल्यानंतर तो उगाच घेतला असंही वाटतं. डीआरएसचा वायफळ वापरावरुन टीकाही होताना दिसते. मात्र नुकत्याच झालेल्या एका सामन्यात साधा रिव्ह्यूही न घेतल्याने संघाचा पराभव झाल्याची अजब घटना समोर आली आहे. सध्या सुरु असलेल्या तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये (TNPL) एक विचित्र प्रकार घडला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. काल म्हणजेच 27 जून रोजी झालेल्या सालेम स्पार्टन्स विरुद्ध लॅका कोवाई किंग्ज या संघादरम्याच्या सामन्यामध्ये हा प्रकार घडला. सालेम शहरातील सालेम क्रिकेट फाऊण्डेशनच्या मैदानामध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. सामन्यात जे घडलं ते पाहून सध्या क्रिकेट चाहत्यांना हा काय वेडेपणा आहे असा प्रश्न पडला आहे. हा सर्व प्रकार म्हणजेच खेळांडूचा आळस आणि पंचांचा हलगर्जीपणा असल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की काय घडलं?

घडलेला हा प्रकार म्हणजे सालेम स्पार्टन्स आणि पंचांचाही गोंधळ झाल्याने घडल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अपील न केल्याने पंचांनी धावबाद असलेल्या खेळाडूला बाद दिलं नाही. कोणी अपीलही केली नाही आणि पंचांनी स्वत:ही तिसऱ्या पंचांची मदत घेतली नाही. त्यामुळेच लॅका कोवाई किंग्जचा सलामीवीर सुजय बाद झाल्यानंतरही खेळतच राहिला. खरं तर सुजयने केलेली चूक पाहता त्याने तंबूत परतणं अपेक्षित होतं. कारण जेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील फिल्डरने बॉल स्टॅम्पवर मारला तेव्हा क्रिजमध्ये पोहचण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुजयने क्रीजमध्ये बॅट टेकवण्याऐवजी हवेत उडी मारली. ही उडी इतक्या अचूक वेळेस होती की बॉल स्टॅम्पला लागायला आणि सुजयची बॅट तसेच दोन्ही पाय हवेत असायचा क्षण एकच होता. मात्र कोणी याची दखलच घेतली नाही.

एकाने जरी अपली केली असती तरी...

सामनाच्या तिसऱ्या षटकामध्ये हा प्रकार घडला. सालेम स्पार्टन्सने सामना जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅका कोवाई किंग्जचा संघ फलंदाजीला उतरला. पहिलं यश मिळाल्यानंतर तिसऱ्या षटकातच दुसऱ्या गड्याला तंबूत धाडण्याची संधी सालेम स्पार्टन्सच्या संघाला चालून आलेली. मात्र त्यांनी बॉल स्टॅम्पला लागून खेळाडू बाद नसेल असं समजून अपीलच केली नाही. 11 खेळाडूंपैकी एकाने जरी केवळ एक अपील केली असती तर क्रिजजवळ पोहोचल्यानंतर बॉलपासून वाचण्यासाठी हवेत उडी मारणारा सुजय तंबूत परतला असता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानेच अपील केली नाही म्हणून पंचांनीही तिसऱ्या पंचापर्यंत जाण्याचे कष्ट घेतले नाही. मात्र पुढल्या चेंडूनंतर मोठ्या पडद्यावर रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू लागला त्या क्षणी सुजयचे दोन्ही पाय हवेत असल्याचे दिसत होते. 

...अन् सामना गमावला

हा प्रकार घडला तेव्हा सुजय केवळ 10 धावांवर होता. मात्र त्याला बाद देण्यात न आल्याने तो खेळत राहिला. त्याने 32 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या. त्याने दिलेल्या योगदानामुळे लॅका कोवाई किंग्ज संघाला 199 धावांपर्यंत झेप घेता आली. हा सामना सालेम स्पार्टन्सने गमावला. 200 धावांचा पाठलाग करताना त्यांना केवळ 120 धावांपर्यंतच मजल मारता आली.