ढाका : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा सध्या एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत आहे. या बंदीमुळे वॉर्नर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नसला तरी तो बांगलादेश प्रिमिअर लीग या टी-२० स्पर्धेमध्ये सिलहेट सिक्सर्स या टीमचं नेतृत्व करत आहे. बांगलादेश प्रिमिअर लीगमधल्या रंगपूर रायडर्सविरुद्ध खेळताना डेव्हिड वॉर्नरचा हटके अंदाज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला.
वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेल याच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नरनं ३ बॉलमध्ये १४ रन केले. पण डावखुरा असलेल्या डेव्हिड वॉर्नरनं उजव्या बाजूनं बॅटिंग करत या रन केल्या. १९ व्या ओव्हरच्या पहिल्या ३ बॉलमध्ये डेव्हिड वॉर्नरला फक्त २ रनच करता आल्या. यानंतर डेव्हिड वॉर्नरनं right handed बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मग गेलच्या पुढच्या तीन बॉलला वॉर्नरनं १ सिक्स आणि २ फोर मारले. सिक्स मारल्यानंतर या मॅचमधलं डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतकही पूर्ण झालं.
Unbelievable by Warner if it’s not working with your left hand switch to your right!!! Shot Boi!!!!Video Credit : https://t.co/WE1KrAg5a3 #BPL19 #CricketPlayedLouder pic.twitter.com/sKUCP3YjSS
— CPL T20 (@CPL) January 16, 2019
क्रिस गेलची उंची आणि तो ज्या ठिकाणी बॉल टाकत होता, तिथून मला फटके मारणं कठीण होतं. मी गोल्फ right handed खेळतो. त्यामुळे मला तशी बॅटिंग करण्यात फार अडचण आली नाही, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला.
दरम्यान डेव्हिड वॉर्नरनं केलेली right handed बॅटिंग ही योग्य असल्याची प्रतिक्रिया क्रिकेट समीक्षक हर्षा भोगले यांनी दिली आहे. बॅट्समन स्विच हिट खेळणार असेल, तर बॉलरला याबाबत माहिती नसते. उलट वॉर्नर ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता, ते पाहता गेलला तो right handed खेळणार आहे हे आधीपासून माहिती होतं. या सगळ्या प्रकारामध्ये काहीच गैर नाही, असं ट्विट हर्षा भोगलेंनी केलं आहे. असं खेळणं कठीण असलं तरी ते योग्य आहे. स्विच हिटही कठीण असला तरी तो अयोग्य आहे, असं हर्षा भोगले म्हणाले.
David Warner batting right handed against Chris Gayle is a legitimate action, unlike the switch hit, because the bowler knows he is bowling to a right hander from the beginning. It is difficult but fair. The switch hit is difficult too but unfair to the bowler.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) January 16, 2019
२०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एका वर्षाची बंदी घातली होती. वॉर्नरवरची ही बंदी २९ मार्चला संपणार आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर निवडीसाठी उपलब्ध होणार आहे. वॉर्नरबरोबरच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरून बॅन्क्रॉफ्ट यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती. स्मिथवर एक वर्षासाठी तर बॅन्क्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन केलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॅन्क्रॉफ्टनं बॉलशी छेडछाड करण्यासाठी सॅण्ड पेपरचा उपयोग केला होता. ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली होती. वॉर्नरनं मला बॉलशी छेडछाड करण्यासाठी उचकवल्याचं बॅन्क्रॉफ्टनं सांगितलं होतं. यानंतर बॅन्क्रॉफ्ट, वॉर्नर आणि कर्णधार असलेल्या स्मिथला शिक्षा करण्यात आली.