Asia Cup 2023 : एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) शनिवारी श्रीलंका विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशाचा पराभव करत एशिया कपच्या फायनलकडे एक पाऊल पुढे नेलं आहे. 9 सप्टेंबर रोजी सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात 21 रन्सने लंकेचा विजय झाला. या पराभवासह बांगलादेश एशिया कपमधून जवळपास बाहेर झाली आहे.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 257 रन्स केले होते. मात्र हे लक्ष्य गाठण्यात बांगलादेशची टीम अपयशी ठरली. सुपर 4 मध्ये पहिल्या सामन्यात बांगलादेशाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना श्रीलंकेला कोणत्याही परिस्थितीत हरवायचं होतं. पण तसं करण्यात त्यांना यश आलं नाही. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशाची टीम 48.1 ओव्हर्समध्ये अवघ्या 236 रन्समध्ये ऑलआऊट झाली.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर एशिया कप 2023 ( Asia Cup 2023 ) च्या सुपर-4 च्या पॉईंट टेबलमध्ये श्रीलंकेने मोठी झेप घेतली आहे. हा सामना जिंकल्यानंतर श्रीलंका टीम टॉप-2 मध्ये पोहोचलीये. बांगलादेशाला पराभूत करून श्रीलंकेच्या खात्यात दोन गुणांची नोंद झालीये. त्यामुळे पाकिस्तानंतर पॉईंट्सटेबलमध्ये लंका दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरा सामना गमावल्यानंतर बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे.
कोण गाठणार फायनल?
श्रीलंकेविरूद्धच्या पराभवामुळे बांगलादेशचं मोठं नुकसान झालंय. ही टीम आता अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेली दिसतेय. बांगलादेशला पहिल्यांदा पाकिस्तानने आणि मग श्रीलंकेने पराभूत केलंय. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला पाकिस्तानला पराभूत करायंच आहे. जर भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तर श्रीलंकेला पराभूत करणं सोपं जाण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया फायनलमध्ये स्थान पक्कं करू शकते. दुसरीकडे फायनल गाठणारी दुसरी टीम कोण असणार यावर सस्पेन्स आहे. कारण श्रीलंका आणि पाकिस्तानची टीम फायनलमध्ये धडक मारू शकते. दोन्ही टीम्सने ज्या प्रकारे कामगिरी केलीये त्यानुसार दोघांमध्येही आव्हानात्मक स्पर्धा दिसतेय.
आज दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा हा दुसरा तर टीम इंडियाचा सुपर 4 मधील पहिलाच सामना आहे. जर पावसाने हा सामना रद्द झाला तर या रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. जर पावसाने खेळ केला तर 11 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येणार आहे.