Manoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!

Manoj Tiwary Retired : मनोज तिवारी याने बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.

सौरभ तळेकर | Updated: Feb 19, 2024, 07:56 PM IST
Manoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद! title=
Manoj Tiwary Retirement

Manoj Tiwary Retirement : स्टार खेळाडू मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने ईडन गार्डन्स मैदानावर बिहारविरूद्ध (Bihar vs Bengal) अखेरचा सामना खेळला. त्याच्या क्रिकेट करिअरमधील शेवटचा सामना ईडन गार्डन्सवर खेळायला मिळाल्यामुळे मनोज तिवारी खूश असल्याचं पहायला मिळालं. मनोज तिवारी (Manoj Tiwary Retirement) याने मागील वर्षी सुद्धा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निरोप घेतला होता. मात्र, काही कारणास्तव त्याने तो निर्णय मागे घेत त्याने पुन्हा एकदा निवृत्तीमधून परत येण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मनोज तिवारी याने आणखी एक वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि बंगालचे नेतृत्व करत बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.

मनोज तिवारीच्या निवृत्तीचा क्षण हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटूंबासाठी खूप भावनिक होता. सामना संपल्यावर मनोज तिवारी याने खेळपट्टीवर गुडघे टेकून त्याच्या सहकारी खेळाडूंचे आभार मानले. यानंतर खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी आणि ग्राऊंड स्टाफचे फ्रेम केलेले फोटो भेट दिले. तर बंगाल क्रिकेट असोसिएशनही सुवर्ण बॅट देऊन मनोज तिवारीचा गौरव केला आहे. त्यावेळी त्याने भावना व्यक्त केल्या. 

काय म्हणाला मनोज तिवारी?

मी खूप आनंदी आहे की, मला माझ्या कारकिर्दीचा अखेरचा सामना माझ्या आवडत्या मैदानावर खेळायला मिळाला आणि मी येथेच निवृत्त झालो, असं म्हणत मनोज तिवारीने आनंद व्यक्त केला, तर फक्त दुःख एका गोष्टीचं आहे की, मी बंगालसाठी रणजी ट्रॉफी जिंकू शकलो नाही आणि या गोष्टीचे मला दुःख वाटत राहील, असं म्हणत त्याने खंत देखील व्यक्त केली आहे.

दरम्यान, मनोज तिवारी हा क्रिकेटपटू असून बंगालचा क्रिडामंत्री सुद्धा आहे. त्याने नुकताच एक विवादास्पद वक्तव्य करून क्रिकेटजगतामध्ये सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मनोज तिवारी म्हणाला होता की, 'रणजी ट्रॉफी ही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यात दरवर्षी हजारो खेळाडू सहभागी होतात. परंतु या स्पर्धेची चमक हरवत चाललेली पाहून मी खूप नाराज आहे.  या स्पर्धेत अनेक चुका होत आहेत आणि इतकी मोठी स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे.', असं म्हणत त्याने बीसीसीआयवर टीका देखील केली होती.