पांड्या- राहुलमुळे भारतीय संघातील सर्वांनाच मिळणार कसे वागायचे याचे धडे!

बीसीसीआयने घातलेल्या बंदीनंतर आता या दोन्ही खेळाडूंना आणखी एक दणका....

Updated: Jan 22, 2019, 09:17 AM IST
पांड्या- राहुलमुळे भारतीय संघातील सर्वांनाच मिळणार कसे वागायचे याचे धडे! title=

मुंबई : 'कॉफी विथ करण' या टेलिव्हिजन कार्यक्रमात महिलांविषयी टीप्पणी करणं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांना चांगलच महागात पडल्याचं स्पष्ट होत आहे. बीसीसीआयने घातलेल्या बंदीनंतर आता या दोन्ही खेळाडूंना आणखी एक दणका बसला आहे. खरंतर या दोघांमुळे संपूर्ण क्रिकेट संघालाच आता शिस्त आणि वर्तणूकीचे धडे देण्यात येणार आहे.

विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या The Committee of Administrators (CoA) यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एका समुपदेशन सत्रात संपूर्ण भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंना वर्तणूकीचे धडे देण्यात येणार आहेत. 
'संघातील वरिष्ठ खेळाडू आणि १९ वर्षांखालील क्रिकेट संघातील नवोदित खेळाडूंचा सहभाग असणारं हे सत्र नॅशनल क्रिकेट अकॅडमी येथे पार पडणार आहे. ज्यामध्ये एक खेळाडू म्हणून वागण्यामध्ये आवश्यक असणाऱ्या निकषांची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये लैंगिक संवेदनशीलतेसारख्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही समुपदेशन करण्यात येणार आहे',  गोपनीयतेच्या अटीअंतर्गत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिली. 

राहुल आणि पांड्या यांच्यासाठी कोणत्या वेगळ्या सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे का, असं विचारलं असता, अधिकाऱ्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. बीसीसीयाचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी युवा खेळाडूंसाठी लैंगिक संवेदनशीलतेविषयीच्या समुपदेशन सत्राचं आयोजन करण्यात यावं, असा पर्याय सुचवला होता. जेणेकरुन भविष्यात अशी परिस्थिती उदभवल्यास त्यांना याचा नीट सामना करता येईल. दरम्यान, सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाचं एकंदर वेळापत्रक हे प्रचंड व्यग्र असलं तरीही काही सत्रांना संघातील खेळाडूंची उपस्थिती असणार आहे. नवोदित खेळाडूंसाठी हे सत्र अतिशय फायद्याचं ठरणार आहे, ज्यांच्यावर आयपीएल सामन्यांलाठी कोट्यवधींची बोली लावण्यात आली आहे. 

एका माजी क्रिकेटपटूच्या मतामुसार, १७ वर्षीय प्रभ सिमरन सिंग (किंग्स इलेव्हन पंजाब - ४.८ कोटी) आणि प्रयास राय बर्मन (आरसीबी- १.६ कोटी) असे खेळाडू रणजी सामने न खेळताही एका रात्रीत कोट्यधीश झाले आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रशिक्षकांची गरज आहे, जे त्यांचं चांगल्या पद्धतीने समुपदेशन करु शकतील. हे सत्र कोणात्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.