रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 9, 2024, 04:34 PM IST
रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान title=

India Vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला गेला. पाचव्या कसोटीत भारताचा मोठा विजय झाला. इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत भारताने मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. या विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना मोठा फायदा होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी प्रत्येक मोसमात किमान सात कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंची मॅच फी सध्याच्या 15 लाख रुपयांवरून 45 लाख रुपये करण्याची घोषणा केली. एका मोसमात सुमारे 10 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या कसोटीपटूला 4.50 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळेल. ही रक्कम खेळाडूला वार्षिक केंद्रीय करारांतर्गत मिळणाऱ्या 'रिटेनर फी' व्यतिरिक्त असेल अशी माहिती जय शहा यांनी दिली. धर्मशालातल्या विजयानंतर जय शहा यांनी ही घोषणा केली.

गेल्या काही वर्षांपासून टी-20 लीगमुळे अनेक भारतीय खेळाडू कसोटी क्रिकेटला महत्त्व देत नव्हते. त्यामुळे देशांतर्गत रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे महत्त्व कमी झालं. यामुळेच अलीकडेच जय शहा यांनी कसोटी क्रिकेट खेळणे अनिवार्य केले. त्यानंतर आता या संदर्भात शहा यांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत त्यांनी कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना वेतनाव्यतिरिक्त प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली आहे. जे खेळाडूंच्या प्रति सामन्याच्या पगारापेक्षा 50-70 टक्क्यांनी जास्त असणार आहे. त्यामुळे एका हंगामात सात किंवा अधिक कसोटी सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी प्रति-सामना 45 लाख रुपये मिळणार आहेत. तर 50 टक्के सामन्यांमध्ये प्लेइंग-11 चा भाग असलेल्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यात एकूण 30 लाख रुपये मिळतील.

या निर्णयामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. दोघेही जवळपास प्रत्येक कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग असल्याने हा फायदा होणार आहे. मात्र दुसरीकडे हार्दिक पंड्याला कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. हार्दिक बराच काळ कसोटी क्रिकेट खेळत नसल्याने त्याचं नुकसान होईल. हार्दिक 2018 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.