द्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर

Indian Cricket Team Head Coach Post: राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 29, 2023, 10:15 AM IST
द्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर title=
बीसीसीआयने द्रविडला दिली ऑफर

Indian Cricket Team Head Coach Post: एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर राहुल द्रविडचा भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी व्ही. व्ही. एस लक्ष्मणच्या प्रशिक्षणाअंतर्गत भारतीय संघ मालिका खेळत आहे. त्यामुळेच आता भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक लक्ष्मणच असेल की इतर कोणी याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक कोण असेल याबद्दलचं गूढ कायम आहे. याचदरम्यान आता प्रशिुक्षकपदासंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने राहुल द्रविडला नवीन ऑफर दिली आहे.

बीसीसीआयने काय ऑफर दिली?

'ईएसपीएन क्रिकेइन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने राहुल द्रविडला नवीन ऑफर देताना कार्यकाळ वाढवून देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यासंदर्भात अद्याप द्रविडने कोणतही उत्तर दिलेलं नाही. आता द्रविड पुन्हा ही जबाबदारी पुढील काही काळासाठी स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर द्रविडने बीसीसीआयची ही ऑफर नाकारली तर कोणाकडे ही जबाबदारी सुपूर्द केली जाणार याबद्दलचं गूढ कायम आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये अनेक वरिष्ठ खेळाडूंबरोबर प्रशिक्षक ग्रुपलाही आराम देण्यात आला आहे. यानंतर भारतीय संघ डिसेंबरमध्ये 3 वेगवेगळ्या फॉरमॅटच्या क्रिकेट मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या मालिकेची सुरुवात 10 डिसेंबरपासून होत आहे. राहुल द्रविडला आराम देण्यात आल्यानंतर अनेकदा लक्ष्मणनेच भारतीय प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

द्रविडच्या नेतृत्वाखाली कामगिरी चांगली पण चषक नाही

राहुल द्रविड 2021 साली रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला. राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. भारताने 2022 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली. इंग्लंडने या स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 मध्ये भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.