मोठी बातमी: कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर

नियोजित वेळापत्रकानुसार IPL स्पर्धा २९ मार्चपासून सुरु होणे अपेक्षित होते.

Updated: Mar 13, 2020, 03:27 PM IST
मोठी बातमी: कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर title=

मुंबई: कोरोना व्हायरसच्या देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे BCCIकडून स्पष्ट करण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार IPL स्पर्धा २९ मार्चपासून सुरु होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या स्पर्धेच्या आयोजनावर टांगती तलवार होती. अखेर ही शक्यता खरी ठरली असून आता IPL १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर पडली आहे. आयपीएलच्या सर्व संघमालकांना याबाबत कल्पना देण्यात आल्याची माहितीही BCCIकडून देण्यात आली. 

आयपीएल स्पर्धेतील गुंतवणुकदार आणि सार्वजनिक आरोग्याविषयी आम्ही सजग आहोत. यासाठी आमच्याकडून योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. जेणेकरून क्रिकेट चाहत्यांना सुरक्षित वातावरणात खेळाचा आनंद लुटता येईल. यासाठी आम्ही क्रीडा मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचे 'बीसीसीआय'कडून स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून (ICC) क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग ए ही स्पर्धादेखील पुढे ढकलली होती.

तत्पूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीत IPL स्पर्धेचे सामने होणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. दिल्लीत २०० पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या भीतीमुळे मेळावे, यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने IPL स्पर्धाही रद्द होण्याची अटकळ बांधली जात होती. कर्नाटकनेही आयपीएल सामन्यांच्या आयोजनास पसंती दर्शवली नव्हती.