Icc T20I World Cup 2021 | टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

बीसीसीआयने (BCCI) टी 20 वर्ल्ड कपसाठी (icc mens t20i world cup 2021) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे.

Updated: Sep 8, 2021, 09:34 PM IST
 Icc T20I World Cup 2021 | टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा title=

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) टी 20 वर्ल्ड कपसाठी (icc mens t20i world cup 2021) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. टीम इंडिया विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. बीसीसीआयने या टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  निवड समितीची अध्यक्ष चेतन शर्मा आणि सचिव जय शाह यांनी पत्रकार परिषदेत या 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. (bcci announced team india 15 members squad for icc mens t20i world cup 2021 at dubai and oman)

शिखर धवन आणि युझवेंद्र चहलला डच्चू

या टी 20 वर्ल्ड कपसाठी सलामीवीर 'गब्बर' शिखर धवन आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल संघात स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनचे तब्बल 4 वर्षानंतर संघात पुनरागमन झालं आहे. 

धोनीकडे महत्त्वाची जबाबदारी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या नेतृत्वात आयसीसीच्या तिन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. दरम्यान या टी 20 वर्ल्ड कपसाठी धोनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. धोनी या स्पर्धेसाठी मेन्टॉर असणार आहे, याबाबतची माहिती जय शाह यांनी दिली आहे.  

दुबई आणि ओमानमध्ये आयोजन

या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे दुबई आणि ओमानमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर फायनल मॅच 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
स्पर्धेतील सर्व सामने हे ओमान, अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथे खेळवण्यात येणार आहेत. 

वर्ल्ड कपसाठी गृपनिहाय संघ

राऊंड 1 –

ग्रुप ए- श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामीबिया

ग्रुप बी- बांगलादेश, स्कॉटलँड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी), ओमान

सुपर 12

ग्रुप 1- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1 आणि बी2

ग्रुप 2- भारत, पाकिस्तान, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ए2 आणि बी1

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

टीम इंडियाचा या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असेलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू :  श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर