वांद्रे टर्मिनसमध्ये आता तीन पार्किंग लाइन तयार होणार, प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?

Mumbai Local News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. वांद्रे टर्मिनसमध्ये तीन पार्किंग लाइन तयार करण्यात येत आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 25, 2024, 12:18 PM IST
वांद्रे टर्मिनसमध्ये आता तीन पार्किंग लाइन तयार होणार, प्रवाशांना नेमका काय फायदा होणार? title=
Mumbai High time WR set up mega terminus three parking line

Mumbai Local News Today: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमध्ये तीन पार्किंग लाइन तयार करण्यात येत आहेत. त्यामुळं आता येथून लांब पल्ल्याच्या अतिरिक्त ट्रेन चालवण्यास मदत होणार आहे. या तीन लाइनवरून दररोज ९ अतिरिक्त मेल एक्स्प्रेस चालवल्या जाऊ शकतात, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सुविधेमुळे ट्रेन थांबविण्याची क्षमता वाढणार आहे. 

मुंबईतून संपूर्ण भारतभरात ट्रेन रवाना होतात. तसंच, कधी कधी ट्रेन रवाना होण्यास किंवा नियोजित ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. मुंबईतून लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेतर्फे अनेक पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. त्यांतर्गत वांद्रे टर्मिनस येथे बांधण्यात येणाऱ्या तीनपैकी दोन पिट लाइन जानेवारी २०२५मध्ये पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केल्या जातील 

उर्वरित एका लाइनचे काम मे २०२५मध्ये पूर्ण केले जाईल. या तीन लाइनसाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वांद्रे टर्मिनस येथे नव्या पार्किंगसाठी पिट लाइनचे काम प्रगतिपथावर आहे. नवीन पार्किंग लाइन तयार झाल्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांसाठी अतिरिक्त गाड्या चालवण्याची योजना आहे.  त्यामुळे  पार्किंग लाइन बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, दोन लाइन जानेवारीत, तर तिसरी लाइन मे महिन्यापर्यंत तयार होईल आणि एक्स्प्रेस चालवण्यासाठी उपलब्ध होतील. 

प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञान

या लाइनसाठी प्री-फॅब्रिकेटेड (पूर्व निर्मित घटक) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये लाइनसाठी लागणारी वेगवेगळ्या रचना आणि आकारातील सामग्री आधीच बनवण्यात येते आणि ती प्रकल्पाच्या ठिकाणी आणून बसवण्यात येते. यामुळे वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होतेच शिवाय प्रकल्पाच्या ठिकाणी काम सोपे होते. या तंत्रज्ञानांतर्गत आवश्यक भागांची निर्मिती राम मंदिर, दादर, अंबरनाथ आणि नागपूर येथे तयार करण्यात येत आहे

 वांद्रे टर्मिनसवरून एकूण ५१ एक्स्प्रेस धावतात. यामध्ये नियमित, साप्ताहिक आणि विशेष गाड्यांचा समावेश आहे. वांद्रे टर्मिनसवरून दररोज सरासरी ३८ हजार ८८९ प्रवासी प्रवास करतात. तीन पिट लाइन तयार झाल्यानंतर दररोज अतिरिक्त ९ एक्स्प्रेस चालवणे शक्य होणार आहे.