लीड्स : पाकिस्तान क्रिकेटसाठी रविवारचा दिवस अत्यंत वाईट राहिला. इंग्लंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ४-०ने पराभव पत्करावा लागला. याचवेळी पाकिस्तानचा खेळाडू आसिफ अलीवर दु:खाचा डोंगर कोसळला. असिफ अलीच्या मुलीचा अमेरिकेमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. आसिफ अलीने या मॅचमध्ये २२ रनची खेळी केली. मुलीच्या निधनामुळे असिफ अली आता इंग्लंडमध्ये थांबणार नाही.
आसिफ अली आता इंग्लंडमध्ये नसला तरी त्याची वर्ल्ड कपसाठीच्या पाकिस्तान टीममध्ये निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये आसिफ अलीने दोन अर्धशतकं केली.
वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये पाकिस्तानने शेवटच्या क्षणी तीन बदल केले. यामध्ये आबिद अलीच्याऐवजी आसिफ अलीला संधी देण्यात आली. आसिफ अलीबद्दलचा निर्णय घेणं कठीण होतं. तो सध्या वाईट काळातून जात आहे. त्याला अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या पहिल्या सराव सामन्याआधी तो इंग्लंडमध्ये येईल. तो जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत त्याची वाट पाहू, असं वक्तव्य पाकिस्तानच्या निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक यांनी केलं. आसिफ अलीने पाकिस्तानकडून १६ वनडे आणि २० टी-२० मॅच खेळल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ४ मॅच पाकिस्तानने गमावल्या, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. या सीरिजच्या प्रत्येक मॅचमध्ये इंग्लंडने ३५० पेक्षा जास्त रन केले. यानंतर पाकिस्तानच्या बॉलवर जोरदार टीका झाली.