न भूतो न भविष्य... अर्जेंटिनाच्या चौका चौकात अलोट जनसागर; थक्क करणारा व्हिडीओ!

अर्जेंटीनाच्या विजयाने जगभरात जल्लोष सुरु झाला. पण ज्या देशाने वर्ल्डकप जिंकलाय तो अर्जेंटिना देश अगदी जल्लोषात बुडालेला दिसला.

Updated: Dec 20, 2022, 07:02 PM IST
न भूतो न भविष्य... अर्जेंटिनाच्या चौका चौकात अलोट जनसागर; थक्क करणारा व्हिडीओ! title=

Argentina Fifa World Cup : एखाद्या महान खेळाडूकडे इतर कितीही ट्रॉफीस असतील मात्र, वर्ल्ड चॅम्पियन (World champion) बनवणारी ट्रॉफी नसेल तर काहीसं अपुरं वाटतं. असं काही अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीसोबत (Lionel Messi) झालं. फिफा वर्ल्डकपचा (FIFA World Cup) खिताब त्याच्याकडे नव्हता, मात्र अखेर त्याने तो पटकावलाच. रविवारी फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीना यामध्ये फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला, हा सामना अर्जेंटीनाने (Argentina) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने जिंकला. अर्जेंटीनाच्या विजयाने जगभरात जल्लोष सुरु झाला. पण ज्या देशाने वर्ल्डकप जिंकलाय तो अर्जेंटिना देश अगदी जल्लोषात बुडालेला दिसला.

वर्ल्डकपच्या विजयानंतर अर्जेंटीनामध्ये जिथे नजर जात होती तिथपर्यंत लोकं रस्त्यावर आनंद साजरा करत होते. यावेळी आपल्या देशाचा झेंडा आणि फुटबॉल टीमची जर्सी घालून लोकं जल्लोष करताना दिसले. या जल्लोषाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

गेल्या काही काळापासून अर्जेंटीना हा देश आर्थिक संकटाचा सामना करत होता. अशामध्ये चाहत्यांसाठी हा वर्ल्डकप म्हणजे संजीवनी ठरला. यावेळी देशात एकंही रस्ता असा नव्हता, ज्या ठिकाणी ज्यावर लोक आनंद साजरा करत नाचताना दिसलेत. मुख्य म्हणजे यावेळी अर्जेंटीनाच्या जनतेने डिएगो मॅराडोना यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. दरम्यान मेस्सीच्या मूळ गावी रोझारियोमध्ये लोकंनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केलाय.

कसा रंगला फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीनाचा सामना

अर्जेंटिनाकडून सामन्याच्या 23 व्या मिनिटाल मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर डी मारियाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला होता. पहिल्या हाल्पमध्ये अर्जेंटिनाकडे आघाडी होती. सामना पूर्णपणे अर्जेंटिनाच्या पारड्यात झुकला होता. दुसऱ्या हाल्फच्या शेवटाला पेनल्टी मिळाल्यावर फ्रान्सच्या एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पहिला आणि 81 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली. 

90 मिनिटांमध्ये सामना  2-2 च्या बरोबरीत सुटला, त्यानंतर 30 मिनिटांचा एक्सट्रा टाईम देण्यात आला. मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आणि 108 व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात आघाडी घेतली. सर्व हताश झाले होते कारण सामना जवळपास फ्रान्सने जिंकला होता मात्र तितक्यात हँड झाला आणि एम्बाप्पेने तिसरा गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला.