भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. कोलंबोत झालेल्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांची पिसं काढली. सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं आणि एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. यानंतर भारताने अत्यंत सहजपणे हे लक्ष्य गाठत आशिया कपवर आपलं नाव कोरलं.
मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या नावे अनेक रेकॉर्ड्स केले. त्याने एकूण 6 विकेट्स घेत महान भारतीय गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं. यामधील चार विकेट तर त्याने फक्त एका ओव्हरमध्येच घेतले आणि सामन्याचा निकाल ठरवून टाकला. सामना जिंकल्यानंतर मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त मोहम्मद सिराजची चर्चा सुरु होती.
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फिदा झालेल्यांमध्ये उद्योजक आनंद महिंद्राही होते. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी मोहम्मद सिराजचं अभिनंदन केलं. "मला वाटत नाही की याआधी कधी माझं मन विरोधकांसाठी रडत होतं, जणू काही आपण त्यांच्याविरोधात अलौकिक शक्तीचा वापर केला आहे. मोहम्मद सिराज तू मार्व्हल अॅव्हेंजर आहेस", अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं.
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या. यादरम्यान एका चाहत्याने "सर त्याला कृपया एसयुव्ही द्या," अशी मागणी केली. त्याच्या या मागणीवर आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलं. आपण आधीच हे काम केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आनंद महिंद्रा यांनी 2021 मध्ये मोहम्मद सिराजला थार गिफ्ट केली होती.
मोहम्मद सिराजने गोलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव दिली नाही. यानंतर टाकलेली ओव्हर त्याच्यासाठी स्वप्नवत ठरली. या एकाच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पाथुम निसांकाला झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असालंका यांच्या विकेट्स घेतल्या. समरविक्रमा पायतीच झाला, तर असलंका कव्हर्समध्ये झेलबाद झाला.
अखेरच्या चेंडूवर त्याने धनंजया डी सिल्वाला झेलबाद केले. या जादुई षटकानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. त्याच्या पुढच्याच षटकात त्याने शनाकाला बोल्ड केले. यासह त्याने अवघ्या 16 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. त्याने सर्वात वेगाने 5 विकेट घेण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी आहे. श्रीलंकेच्या चमिंडा वासने 2003 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध केवळ 16 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
2008 मध्ये श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध 6/13 अशी कामगिरी केली होती. यानंतर आशिया चषकाच्या फॉर्मेटमध्ये 6 बळी घेणारा सिराज हा दुसरा गोलंदाज ठरला.