मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचं बीसीसीआयचा अध्यक्ष बनणं निश्चित झालं आहे. तर बाकीच्या महत्त्वाच्या दोन पदांवर भाजप नेत्यांच्या नातेवाईकांची नियुक्ती होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयचे सचिव बनणार आहेत, तर भाजपचे दुसरे नेते आणि वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमल कोषाध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
२३ ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार आहे. १४ ऑक्टोबरला यासाठीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी शनिवार आणि रविवारी दिल्ली आणि मुंबईत राज्य क्रिकेट संघाच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये गांगुलीचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं. याचसोबत ब्रजेश पटेल यांचं आयपीएल अध्यक्ष बनणंही निश्चित झालं आहे.
जय शाह हे गुजरात क्रिकेट संघाचे माजी संयुक्त सचिव होते, तर अरुण धुमल हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत. सी.के.खन्ना हे सध्या बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
सौरव गांगुलीला २०२० पर्यंतच अध्यक्षपदी कायम राहता येणार आहे. सौरव गांगुलीला काही काळासाठी लांब राहावं लागणार आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार प्रशासकीय पदावर एखादी व्यक्ती लागोपाठ ६ वर्षांपेक्षा जास्त राहू शकत नाही. गांगुली हा २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर आहे.