मुंबई : 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. या दौऱ्यामध्ये सिडनीमध्ये खेळलेला कसोटी सामना खूप चर्चेत होता. सिडनी कसोटी अनिर्णित संपल्यात, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी मुद्द्यावरून टिप्पणी करण्यात आली होती.
सिडनी टेस्ट सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सामना अधिकाऱ्यांशी वर्णद्वेषाबाबत टीकेसंदर्भात वक्तव्य केलं. त्यानंतर जेव्हा पुन्हा पुढच्या दिवशी सकाळी हा प्रकार सुरू असताना भारतीयांनी पुन्हा अंपायरकडे तक्रार केली. चौथ्या दिवशी खेळ दहा मिनिटं थांबवण्यात आला. त्यावेळी स्टँडमधून एका गटाला बाहेर काढलं आणि त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला.
अजिंक्य रहाणेने सिडनी टेस्टबाबत खुलासा केला आहे की, अंपायर पॉल रायफेल आणि पॉल विल्सन यांनी भारतीय खेळाडूंना खेळायचं नसेल तर ड्रेसिंग रूममध्ये परत जाण्यास सांगितलं होते. पण टीम इंडियाने प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढून पुन्हा सामना सुरू ठेवण्याचा आग्रह धरला.
त्या मालिकेवर बनवलेल्या 'बंद में है दम' या सिरीजच्या लॉन्चिंगच्या वेळी रहाणे म्हणाला, "चौथ्या दिवशी सिराज पुन्हा माझ्याकडे आला तेव्हा मी अंपायरना सांगितलं की, आम्ही तोपर्यंत खेळणार नाही, जोपर्यंत या प्रकरणाबाबत एक्शन घेतली जात नाही. त्यावर पंचांनी सांगितले की, तुम्ही खेळ थांबवू शकत नाही आणि हवं असल्यास बाहेर जाऊ शकता."
रहाणे पुढे म्हणाला, आम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसण्यासाठी नाही तर खेळण्यासाठी आलो आहोत. तो ज्या परिस्थितीतून गेला होता त्या पाहता आपण त्याला साथ देणं महत्त्वाचे होतं. सिडनीमध्ये जे घडलं ते पूर्णपणे चुकीचे होतं.