MI vs CSK : मुंबईकर रहाणेने केला पलटणचा 'गेम'; 7 विकेट्सने चेन्नईचा एकहाती विजय

चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईचा पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 8, 2023, 11:10 PM IST
MI vs CSK : मुंबईकर रहाणेने केला पलटणचा 'गेम'; 7 विकेट्सने चेन्नईचा एकहाती विजय title=

MI vs CSK : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आज आयपीएलमधला एल क्लासिको सामना रंगला होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे. चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईचा पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सला अजूनही विजयाचा सूर गवसलेला नाही.

वानखेडेवर रहाणे नावाचं तुफान

आजच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो अजिंक्य रहाणे. टॉस जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने चेन्नईला 158 रन्सचं लक्ष्य दिलं. हे लश्र्य अजिंक्य रहाणेच्या वेगवान फलंदाजीमुळे 18.1 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स राखून सुपर किंग्जने सहज गाठलं.

मुंबई इंडियन्सचे फलंदाज फेल

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना विजयाची अपेक्षा होता. मात्र पुन्हा एकदा मुंबईची फलंदाजी फ्लॉप ठरली. मुंबईच्याच स्टेडियममध्ये पलटणचे दिग्गज फलंदाज फेल गेले. फलंदाजीला सुरुवात करताना ओपनर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी 3.6 ओव्हर्समध्ये 38 रन्स केले. 

यावेळी चौथ्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर इशान किशन 32 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतला. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र अवघा 1 रन करून तो देखील बाद झाला. 

याशिवाय कॅमेरून ग्रीन (11) आणि टीम डेव्हिड (31) यांनाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. 20 ओव्हर्स पूर्ण होत असताना हृतिक शोकिनचे 18 रन्स आणि काही मोठ्या शॉट्समुळे मुंबई इंडियन्सच्या टीमला 150 पार स्कोर नेण्यास मदत झाली.

सीएसकेचा सलग दुसरा विजय

यंदाच्या सिझनमधील हा चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा विजय होता. मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सने मात करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यामधील  दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यापूर्वी सीएसकेने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. 

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला अजूनही विजयासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. यंदाच्या सिझनमधील मुंबईचा हा सलग दुसरा पराभव होता.