Hardik Pandya As MI Captain : क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक अतुलनीय खेळी खेळणारा डिव्हिलियर्स (AB de Villiers) भारतात खूप लोकप्रिय आहे. आयपीएलमध्ये (IPL 2024) आरसीबीकडून खेळलेल्या मिस्टर 360 ने भारतीयांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलंय. अशातच आता डिव्हिलियर्सने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) निर्णयावर मोठं वक्तव्य केलं होतं. मुंबईने रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेऊन हार्दिकला संघाचा म्होरक्या केलंय. त्यामुळे डिव्हिलियर्सने यावर आपलं मत मांडलं.
काही लोक त्याबद्दल आनंदी होतील, तर काही लोक दु:खी होतील. मी एक पोस्ट वाचली जिथं मुंबई इंडियन्सने लाखो फॉलोअर्स गमावले त्यामुळे असं दिसतंय की लोकांनी हे वैयक्तिकरित्या घेतलं आहे की हार्दिकने रोहितची जागा घेतली आहे. मात्र, मी ते मुंबई इंडियन्ससाठी वाईट निर्णय म्हणून पाहत नाही, असं मत एबी डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.
रोहित मुंबईसाठी उत्कृष्ट कर्णधार आहे. पण तो भारतीय कर्णधार देखील आहे आणि आता त्याच्यासाठी थोडासा स्थिरावण्याची आणि खेळाचा आनंद घेण्याची आणि इतर कोणावर तरी जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. मला वाटतं की रोहितने भार पाहता जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे आणि त्याच्या फलंदाजी कौशल्यावर अधिक लक्ष केंद्रित करू इच्छितो. हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, ही सर्वांसाठी गुड न्यूज असायला हवी, असंही एबीडी म्हणतो.
दरम्यान, तुम्ही म्हणू शकता की सूर्या आणि बुमराह ब्रँडशी अधिक निष्ठावान होते आणि हार्दिक पुढे गेला पण तो आता परत आला आहे. निर्णयावर नकारात्मक प्रतिक्रिया पाहून मला आश्चर्य वाटलं. त्या माणसाला परत येण्याची संधी द्या. मला खात्री आहे की, त्याने संघातील इतरांसोबत ट्रॉफी उचलली तर तुम्हाला अडचण येणार नाही, असंही डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.