वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव; कर्णधार कोहलीच्या नावे 'हे' लाजिरवाणे विक्रम

वर्ष 1992 नंतर प्रथमच अवांछित विक्रम कर्णधार विराटच्या नावावर जोडला गेला.

Updated: Oct 25, 2021, 03:21 PM IST
वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव; कर्णधार कोहलीच्या नावे 'हे' लाजिरवाणे विक्रम title=

मुंबई : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना असेल तर टीम इंडियाला नेहमी विजयाची हमी असते. मात्र रविवारी दुबईत इतिहासाची पानं उलटली आणि 29 वर्षांनंतर पाकिस्तानच्या संघाला वर्ल्डकपच्या सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश आले. वर्ष 1992 नंतर प्रथमच हा अवांछित विक्रम कर्णधार विराटच्या नावावर जोडला गेला. मोहम्मद अझरुद्दीनपासून महेंद्रसिंग धोनीपर्यंत कोणत्याही कर्णधाराला हा दिवस पाहावा लागला नाही. पण क्रिकेट हा एक खेळ आहे. प्रत्येक कर्णधाराच्या कारकिर्दीत आणि संघात चढ -उतार असतात.

या वर्ल्डकपनंतर विराट कोहली टी-20चं कर्णधारपद सोडणार आहे. या वर्ल्डकपमध्ये त्याच्या कर्णधारपदाखाली पाकिस्तानविरूद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी त्याला मिळेल की नाही माहीत नाही. तर आज विराटच्या अशा निराशाजनक विक्रमांवर नजर टाकूया जे कोहलीच्या नावे झाले आहेत.

29 वर्षांनंतर हरली टीम इंडिया

या पूर्वी टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध 12-0 अशी आघाडी घेतली होती. एकदिवसीय वर्ल्डकपच्या 7 सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. तर टी-20 वर्ल्डकप टीम इंडियाने पाकिस्तानला 5 वेळा हरवलं होतं. मात्र आता 29 वर्षांच्या वर्चस्वानंतर विजय-पराजयामधील फरक 12-1 असा झाला आहे.

10 विकेट्सने मिळाला पराभव

आतापर्यंत भारताला टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 विकेट्सने पराभवाला सामोरं जावं लागलं नाही. यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 9 पेक्षा जास्त विकेट्सनी पराभव केला होता. एवढेच नाही तर आजपर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्येही भारताने पाकिस्तानला कधीही 10 विकेट्स राखत हरवलं नव्हतं. 1997 मध्ये लाहोरमध्ये भारताला 9 विकेटने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

दुसऱ्यांदा झाला 10 विकेट्सने पराभव

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ही दुसरी वेळ आहे जेव्हा टीम इंडिया क्रिकेटमध्ये 10 विकेट्सने हरली आहे. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने मुंबईत भारताचा 10 विकेट्सने राखत पराभव केला होता. या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 256 धावांचं लक्ष्य गाठले होते. फिंच आणि वॉर्नर या दोघांनीही ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी शतकं झळकावली होती.

पहिल्यांच सामन्यात पराभव

टी -20 वर्ल्डकपमध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2016 टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडिया अवघ्या 79 च्या रन्सवर ऑलआऊट झाली होती.