१८ वर्षाच्या खेळाडूनं ब्रॅडमनना मागे टाकलं!

क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू कोण?

Updated: Jan 9, 2018, 10:29 PM IST
१८ वर्षाच्या खेळाडूनं ब्रॅडमनना मागे टाकलं! title=

मुंबई : क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू कोण? या प्रश्नाचं उत्तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन हे आहे. पण अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटपटूनं ब्रॅडमन यांचं हे रेकॉर्ड मोडलं आहे. या बॅट्समनचं नाव आहे बहीर महबूब शाह. १८ वर्षांच्या बहीरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त रन्स बनवल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी १२७.११ एवढी आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी मॅचमध्ये एक हजार रन्स ९५.१४ च्या सरासरीनं बनवल्या होत्या. अशा प्रकारे बहीरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सरासरीनं रन्स बनवण्याच्या ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डला मागे टाकलं आहे.

बहीरनं पहिल्याच मॅचमध्ये बनवल्या २५६ रन्स

बहीर शाहनं त्याच्या पहिल्याच प्रथम श्रेणी मॅचमध्ये नाबाद २५६ रन्स केल्या होत्या. पहिलीच मॅच खेळतानाचा हा दुसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. बहीरनं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्येच त्रिशतक झळकावलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एवढ्या लहान वयात त्रिशतक मारणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियादाद या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

बहीर शाहनं चार मॅचच्या सहा इनिंगमध्ये ८३१ रन्स बनवले होते. २५६ रन्सच्या नाबाद खेळीनंतर त्यानं पुन्हा दोन इनिंगमध्ये शतक केलं. यानंतर चौथ्या मॅचमध्ये नाबाद ३०३ रन्स करण्याचा विक्रम त्यानं केला.

दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन हाशीम आमला आपला आदर्श असल्याचं बहीर शाहनं सांगितलं आहे. बहीर शाह सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. जगभरातल्या दिग्गज बॉलर्ससमोर आता बहीर कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागलं आहे.