...तर प्रत्येकाला 1 BMW कार, 1 कोटी रुपये कॅश देणार; भारतातील 'या' संघाची खेळाडूंना ऑफर

1 Crore Cash And BMW To Each Player: या संघाला दिलेलं आव्हान यंदा नाही तर पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे. यामागील कारणही पुरस्कार घोषित करणाऱ्याने सांगितलं आहे. अन्य बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Feb 23, 2024, 03:46 PM IST
...तर प्रत्येकाला 1 BMW कार, 1 कोटी रुपये कॅश देणार; भारतातील 'या' संघाची खेळाडूंना ऑफर title=
अनेक घोषणा क्रिकेट असोसीएशनने केल्यात. (प्रातिनिधिक फोटो)

1 Crore Cash And BMW To Each Player:  हैदराबादच्या रणजी संघाने मंगळवारी मेघालयविरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकून स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. रणजी चषकाच्या वरिष्ठ गटामधील हैदराबादच्या संघाचं आव्हान कायम असून फलंदाजीच्या जोरावर हा सामना त्यांनी जिंकला. तिलक वर्मा आणि गेहलोत राहुल सिंह या दोघांनी दुसऱ्या डावात अर्धशतकं झळकावली. त्यांच्या या खेळीचा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. या विजयानंतर हैदराबाद क्रिकेट असोसीएशनने (एचसीएने) एक मोठी घोषणा केली आहे. एचसीएने प्लेट ग्रुप विजेत्यांना 10 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र बक्षिसांची संख्या एवढ्यापुरती मर्यादित नाही. 

...तर प्रत्येकाला बीएमडब्ल्यू आणि 1 कोटी

एचसीएचे प्रमुख जगन मोहन राव अर्सिह्नपल्ली यांनी पुढील 3 वर्षांमध्ये रणजी ट्रॉफी जिंकून आणली तर हैदराबाद संघातील प्रत्येक खेळाडूला एक बीएमडब्लू कार दिली जाईल अशी घोषणा केली आहे. संपूर्ण संघाला 1 कोटी रुपयांचं रोख बक्षिस दिलं जाणार असल्याचीही घोषणा केली आहे.

का केली ही घोषणा?

"खेळाडूंना तसेच असोसीएशनमधील इतर भागीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षी हे ध्येय गाठता येईल असं सध्या तरी दिसत नाही. त्यामुळेच मी त्यांना 3 वर्षांचा कालावधी दिला आहे," असं राव यांनी 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

मिनी स्टेडियम उभारणार

"रविवारी आमची या वर्षातील पहिली सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीमध्ये पुढील वाटचाल कशी असावी याबद्दल चर्चा केली. सध्या जिमखाना मैदानांवर हैदराबाद क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्सची सुविधा आहे. शहराच्या चार वेगवेगळ्या भागांमध्ये तात्पुरत्या स्वरुपातील अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव मी मांडला आहे. भावी क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली पाहिजे आणि त्यांच्या घरांजवळ त्यांना सोयी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत हा यामागील हेतू आहे. एचसीएच्या अंतर्गत जवळपास 10 जिल्हे येतात. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य केंद्रावर मिनी स्टेडियम उभारण्याचा विचार करत आहोत. या माध्यमातून भावी क्रिकेटपटू ओळखून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जाईल," असं राव म्हणाले.

शेवटची कधी जिंकलेली ट्रॉफी?

हैदराबादने 1937-38 मध्ये आणि 1986-87 मध्ये रणजी चषक जिंकला होता. मात्र मागील पर्वांमध्ये ते वरिष्ठांच्या ब गटामध्ये तळाशी राहिल्याने त्यांना यंदा प्लेट डिव्हिजनमधून खेळावं लागल. त्यांनी 7 पैकी 1 च सामना मागील पर्वात जिंकल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. मात्र आता उत्तम खेळ करुन चषक जिंकण्याबरोबरच बीएमडब्लू जिंकण्याचीही संधी खेळाडूंकडे आहे.