शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?

Gudi Padwa 2024:  गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 8, 2024, 11:05 AM IST
शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं? title=
What is Shalivahan Shake starting from Gudipadva know the meaning of it

Gudi Padwa 2024:  गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होती. गुढीपाढव्याला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाढवा हा शुभ मानला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात शक संवस्तर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते. हाच दिवस महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. तर, इतर राज्यातही निरनिराळ्या नावांनी साजरा करण्यात येतो. आज जगभरात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित आहे. देशातील कामकाजही त्याच दिनदर्शिकेनुसार चालते. मात्र, असे असले तरी धार्मिक कार्यासाठी हिंदू दिनदर्शिकेचाच वापर केला जातो. भारतात शक आणि विक्रम या दोन दिनदर्शिकांचे महत्त्व अजूनही आहे. शालिवाहन शके म्हणजे काय आणि याची सुरुवात कोणी केली, याची माहिती जाणून घ्या. 

शक संवत्सर हे फाल्गुन महिन्यातील शेवटच्या अमावस्येनंतर चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी शुल्क पक्षात सुरू होते. महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यात शक संवस्तर हे शालिवाहन शक या नावाने प्रसिद्ध आहे. शालिवाहन शकाचा कालगणनेसाठी वापर करतो. शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. 

शालिवाहन शक कोण होते? 

महाराष्ट्राच्या इतिहासात सातवाहन राज्यांचा समृद्ध इतिहास आहे. त्याकाळी सातवाहनांची राजधानी पैठण ही होती. महाराष्ट्र आणि शेजारील प्रदेशांवर त्यांनी दीर्घकाळ राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करुन सातवाहनांचा पराभव केला. त्यामुळं त्यांचे महाराष्ट्रावरील वर्चस्व संपले त्यामुळं त्यांना दक्षिणेत जावे लागले. मात्र, कालांतराने सातवाहन घराण्यातील तेवीसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने पुन्हा एकदा शकांवर हल्ला केला. नाशिकमधील गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये युद्ध झाले. यात शकांचा राजा नहपान यांचा मृत्यू झाले व सातकर्णींनी युद्ध जिंकले व पुन्हा एकदा या प्रदेशात वर्चस्व सिद्ध केले. 

शालिवाहन शक कधी सुरू झाले?

इसवी सनाच्या 78व्या वर्षी शालिवाहन राजाने सुरु केलेली कालगणना आपण मराठी कालगणना म्हणून वापरतो, असं म्हणतात. शालिवाहन शक इसवीसन 78 मध्ये सुरू झाला म्हणजे आजच्या इंग्रजी वर्षातून 78 वजा केल्यास शालिवाहन शके मिळतात. उदा. 2024-78= 1946 सुरू झाले. 

शालिवाहन शके या कालगणनेतला शके हा शब्द शक राजाशी निगडीत असल्याचे मानतात. मात्र ते खरे नसल्याचे अभ्यासक म्हणतात. शक ही कालगणनेची पद्धत आहे. काही लोक त्याचा संबंध शकांशी लावतात. शक हा संवत अशा अर्थाने वापरतात.