Mangalwar Upay: आठवड्याचा प्रत्येक वार हा अमुक देवतांना समर्पित असतो. तर या वारांना काही विशेष देवतांची पूजाही केली जाते. मंगळवारसुद्धा तसाच एक. गणपतीचा वार, म्हणून जरी आपण या वाराला ओळखत असलो तरीही त्या दिवशी पूजा मात्र मारुतीरायाची केली जाते. अंजनीपुत्र हनुमंताची पूजा मंगळवारी केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. भक्तांच्या मागे असणारी अनेक संकटं नाहीशी होतात. ज्यांला मंगळाचं बळ नाही, अशांनीसुद्धा आजच्या दिवशी पूजा केल्यास त्यांना याचा फायदा होतो. (Mangalwar Upay significance and importance of hanuman puja )
मंगळवारच्या दिवशी हनुमानाची आराधना केली जाते. या दिवशी या बलाढ्य रामभक्ताला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पाठ करावा. सुयोग्य प्रकारे ही पूजा केल्यास त्याचा फायदाच होतो. या दिवशी उपवास ठेवल्यामुळं पत्रिकेतील मंगळाची स्थिती भक्कम होते. शुभाशीर्वाद मिळतात. शनीची साडेसाती आणि शनी दशा दूर होते.
मंगळवार हा आठवड्यातील अतिशय महत्त्वाचा वार आहे. या दिवशी उपवास ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. या दिवशी उपवास केल्यास आदर, साहस, सामर्थ्य आणि पुरुषार्थात वृद्धी होते. इच्छिलेल्या सर्व गोष्टी या दिवसाच्या उपवासामुळं मिळतात. ठराविक मुहूर्तावर मारुतीरायाची पूजा केल्यास त्याचे फायदेही तसेच मिळतात.
पूजेसाठी काही गोष्टींची काळजी घ्या
मंगळवारी मारूतीरायाची पूजा करायची असली तरीही त्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की ही पूजा जितकी सोपी वाटते तितकीच ती कठीण आहे. या वाराला तुम्ही सकाळी उठून स्नानानंतर लाल रंगाचे वस्त्र धारण करणं अपेक्षित असतं. तुम्ही घातलेले कपडे इतर कुणीही वापरलेले नसावेत. या दिवशी तुम्ही देवघरही स्वच्छ करू शकता.
यासाठी घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करून तिथं एका चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरा. त्यावर हनुमंताची मूर्ती ठेवा आणि सोबत राम- सीतेचीही मूर्ती ठेवा. हनुमंतासमोर तुपाचा दिवा लावा. सुंदरकांड पाठ सुरु करा आणि मारुतीरायाचे मंत्रोच्चार करा. यावेळी देवाला लाल फूल, लाल कुंकू, शेंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा.
अशी धारणा आहे, की मंगळवारी सकाळी आणि सायंकाळी हनुमानाची पूजा करण्याचे कैक फायदे आहेत. या दिवसाला तुम्ही सूर्योदयानंतर आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर हनुमंताची पूजा करु शकता. सूर्यास्तानंतर पूजा केल्यास त्याचे फलशृत थक्क करणारं असतं.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यता आणि संदर्भांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)