मकर संक्रांती शुभ की अशुभ?

यावर्षी मकरसंक्रांती १५ जानेवारीला

मकर संक्रांती शुभ की अशुभ? title=

मुंबई : एखादी वाईट घटना घडली की ' संक्रांत आली!' असे म्हणण्याची प्रथा आहे. परंतू ही प्रथा चुकीची आहे. ‘मकर संक्रांत ‘ म्हणजे  सूर्याने धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणे. धनू राशीतून सूर्य मकर राशीत जाणे हे वाईट कसे असू शकेल ? सूर्याच्या मकर संक्रांतीपासून दिनमान वाढत जाते ही तर चांगली गोष्ट आहे. मग मकर संक्रांती अशुभ कशी असू शकेल ? या दिवशी देवीने राक्षसाला ठार मारले अशीही एक समजूत आहे. ही गोष्ट देखील वाईट कशी असू शकेल ? म्हणून मकर संक्रांती ही वाईट नाही. तसेच ती अशुभही नाही असे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

मकर संक्रांती विषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, सोमवार १४ जानेवारी २०१९ रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार, दि. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. 

मकरसंक्रांतीविषयी एक कथा सांगितली जाते. शंकरासुर नावाचा राक्षस जनतेला खूप त्रास देत असे. त्याला ठार मारण्यासाठी परमेश्वराने संक्रांतीदेवीचा अवतार घेतला.त्या संक्रांतीदेवीने शंकरासुर राक्षसाला ठार  मारले. त्यामुळे लोक शांतपणे जीवन जगू लागले. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुर राक्षसाचा वध केला म्हणून दुसर्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. संक्रांतीचा आदला दिवस ‘ भोगी ‘ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि खिचडी असा बेत केला जातो.

संक्रांती पुण्यकालात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ भरलेले भांडे , तीळ, लोकरीचे वस्त्र, तूप,  सोने, भूमी, गाय, कपडे इत्यादी उपयुक्त वस्तू गरजू लोकांना दान म्हणून द्याव्यात असे सांगण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवसात काहीजण चुकीच्या अफवा पसरवतात. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. मकर संक्रांत ही वाईट नसते. अशुभ नसते. त्यामुळे संक्रांतीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. उलट मकर संक्रांत आनंदाने साजरी करावी. कुणाशी मतभेद झाले असतील, कुणाशी भांडण झाले असेल, कुणाशी अबोला धरला गेला असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्या व्यक्तीला तिळगूळ देऊन “ तिळगूळ घ्या आणि गोड बोला ! “ असे सांगून मकर संक्रांतीच्या दिवसापासून हितसंबंध सुधारण्यासाठी प्रथम आपल्याकडूनच सुरुवात करावी. “ इतरांना क्षमा करा आणि झाले गेले विसरून जा. “ अशी शिकवण मकर संक्रांतीचा हा गोड सण आपणासर्वांस देत असतो.

मकर संक्रांतीनंतर दिनमान वाढतो                                    

सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते. आपल्या इथे शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ पासूनच दिनमान वाढू लागले . आपली पंचांगे सायन राशीचक्रावर आधारलेली नसून निरयन राशीचक्रावर आधारलेली आहेत. सोमवार १४ जानेवारी २०१९ रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने निरयन मकर राशीप्रवेश जर सूर्यास्तानंतर केला तर मकर संक्रांती पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानावा असे सांगण्यात आले आहे. 

 २१ डिसेंबरला आपल्या इथे रात्र मोठी असते व या दिवसापासून दिनमान वाढत जाते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे सर्वत्र  दिनमान व रात्रीमान समान असते. २१ जूनला आपल्याइथे दिनमान मोठे असते.नंतर  हळूहळू ते कमी होऊ लागते. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला असल्यामुळे हे घडत असते.

हिंदूंचे सर्व सण तिथींवर आधारलेले असता मकर संक्रांती १४ जानेवारीला येते असा काही लोकांचा जो समज आहे, तो चुकीचा आहे. मकरसंक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा निरयन मकर राशीत प्रवेश केल्यापासून तो पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस,सहा तास, नऊ मिनिटे आणि दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. इंग्रजी कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्यावर्षी लीपवर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर ४०० वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो.

तसेच, दरवर्षींचा नऊ मिनिटे,  दहा सेकंद हा काल साठत साठत दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने ती पुढे सरकत सरकत सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की १४ जानेवारी आणि मकर संक्रांती यांचा काहीही संबंध नाही.

 मकर संक्रांतीला तिळाचे महत्व 

मकरसंक्रांतीच्या दिवसात जास्त थंडी असते. या थंडीच्या दिवसात तीळ शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. तीळ हे चांगले शक्ती देणारे पौष्टिक औषध आहे. रात्री मूठभर  तीळ खाऊन त्यावर गरम पाणी पिऊन झोपल्यास सकाळी पोट साफ होते. मूळव्याधीवर तीळ हे चांगले औषध आहे. कोठेही सूज आली असेल,  तर तीळ वाटून ऊन करून शेकले असता सूज कमी होते. तीळ व्रणावरही उत्तम औषध आहे. पोटदुखीवर तीळ उत्तम उपायकारक आहेत. तीळाचे तेलही औषधी आहे. तीळाचे तेल आहारात असेल तर वृद्धत्त्व उशीरा येते. म्हणूनच मकर संक्रांतीला तीळ खाण्यास सांगितलेले आहेत. तीळाचे लाडू, तीळाचा हलवा, तीळगूळमिश्रित पोळी, तीळगुळाच्या वड्या इत्यादी पदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.

मकरसंक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे  वस्त्र सूर्यप्रकाशातील ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवते म्हणून आणि वाढलेल्या रात्रीला निरोप म्हणून  मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. नवीन लग्न होऊन घरात आलेल्या सूनेला आणि नवीन जन्मलेल्या मुलांना हलव्याचे दागिने व काळ्या रंगाची वस्त्रे नेसवून उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. तसेच यादिवशी महिला ‘ हळदीकुंकू ‘ समारंभही साजरे करतात.

 मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. ही प्रथा गुजरातमधून महाराष्ट्रात आली. वाढत जाणाऱ्या दिनमानाच्या आनंदाप्रीत्यर्थ व सूर्याला वंदन करण्यासाठी पतंग उडविण्याची प्रथा सुरू झाली असावी. परंतु आकाश हे पक्षांचे आहे. पतंग उडवितांना वापरण्यात येणार्या धारदार मांज्यामुळे आकाशात उडणारे अनेक पक्षी जखमी होतात. काही पक्षी तर मरण पावतात. हे योग्य नाही. आपण आनंद घेत असतांना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. काही वेळा तर स्कूटरवरून जाणाऱ्या प्रवाशांचा गळा धारदार मांज्यामुळे कापला गेल्याने मृत्यू ओढविल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा हा सण ‘ पोंगल ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. पहिला दिवस ‘ इंद्रपोंगल ‘ असतो. या दिवशी इंद्राची उपासना करतात. दुसरा दिवस ‘ सूर्य पोंगल ‘ असतो. या दिवशी सूर्याची उपासना करतात.यादिवशी अंगणात दूध, साखर व तांदूळ घालून भांडे चुलीवर ठेवतात. त्याला उकळी फुटली की “ पोंगल ओ पोंगल “ अशा गर्जना करून सूर्याला अभिवादन करतात. खीर तयार झाली की गणपतीस नैवेद्य अर्पण करतात. थोडी खीर गाईला देऊन उरलेली खीर प्रसाद म्हणून भक्षण करतात. तिसरा दिवस ‘ मट्टपोंगल ‘  म्हणजे गाईचा पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी गावातून गुरांची व घोड्यांची मिरवणूक काढतात. संपूर्ण भारतात मकरसंक्रांतीचा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो.

पुढच्यावर्षी मकरसंक्रांती बुधवार, दि. १५ जानेवारी २०२० रोजी येणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.