Hartalika 2024 : महिनांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ मानलं जातं. माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून आणि मनासारखा पती लाभावा आणि विवाहित महिला पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करतात. कुमारिका आणि सौभाग्यवती हे व्रत करतात.
हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील सगळ्यात पहिला सण आहे. जो महिलांसाठी अतिशय श्रेष्ठ आहे. हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथीला करण्यात येतं.
भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतिया तिथी ही गुरुवारी 5 सप्टेंबरला 12.21 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबरला दुपारी 3.01 वाजेपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार हे व्रत 6 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.
यंदा हरतालिका पूजेसाठी 2 तास 31 मिनिटं असणार आहे. हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 06:02 ते 08:33 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्तावर केले कार्याचे दुप्पट शुभ फळ मिळतात अशी मान्यता आहे. हरतालिकेला ब्रह्म मुहूर्त हा 4.30 ते 5.16 वाजेपर्यंत असणार आहे.
तर हरतालिकेला राहुकाळदेखील आहे. यादिवशी सकाळी 10.45 ते 12.19 पर्यंत राहुकाळ असणार आहे. त्यामुळे या काळात पूजा करणे टाळा. या काळातील पूजेचे फळ मिळत नाही.
हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावं. पांढरे तीळ आणि आवळा एकत्र वाटून त्या उटणाने आंघोळ करावी. या दिवशी फक्त फळांवर उपवास केला जातो. शुभ मुहूर्तावर चौंरंगावर लाल कपडा परिधान करुन त्यावर आणलेल्या वाळूपासून तीन शिवलिंग तयार करावे. आजकाल बाजारात हरतालिका मूर्ती मिळतात. त्यांची पूजा करावीत. काही ठिकाणी दोन मूर्तीची पूजा करण्यात येते. पार्वती आणि तिची सखी अशा दोन मूर्तीची पूजा करण्यात येते.
त्याची षोडशोपचार पूजा करावी. पूजा करताना उमामहेश्वर देवताभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. या मंत्राशिवाय गौरी मे प्रीयतां नित्यं अगनाशाय मंगला| सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये|| या मंत्राचा जप करा. हरतालिका पूजेच पठण करावं. संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी.
हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली. पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता होती. एक दिवस नारायण - नारायण करीत नारद मुनी तेथे आलेत. त्यांनी विष्णूने तुमच्या मुलीस मागणी घातली आहे, असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले. कारण तिला भगवान शंकराशी विवाह करायचा होता. त्यामुळे पार्वती सखीसह अरण्यात घर सोडून निघून गेली. तेथे नदीकाठी वाळुचं शिवलिंग तयार केलं आणि त्याची मनोभावे पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिया तिथा होता. त्यादिवशी पार्वतीने कठीण उपवास केला. तिचा पूजा भोलेनाथापर्यंत पोहोचली आणि ते प्रगट झाले. तुझी इछ्छा पूर्ण होईल असा वर दिला.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)