भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे आरोपांच्या चक्रव्युहात सापडलेत. विनोद तावडेंबाबत भाजप नेत्यांनी टीप दिल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. हितेंद्र ठाकूर यांच्या या दावा खरा असावा असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय. या प्रकरणाच्या निमित्तानं बहुजनांचं राजकारण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपची बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले.. यावेळी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी तिथे जोरदार गोंधळ घालायला सुरूवात केली. गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी तिथे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर त्यांच्या सर्थकासंह पोहोचले. त्यानंतर चौथ्या मजल्यावर जिथे बैठक सुरू होती तिथे ठाकूर गेले. यावेळी क्षीतिज ठाकूर आणि विनोद तावडेंमध्ये शाब्दिक चकमक झाली. बविआ आणि भाजप यांचा राडा तब्बल 3 तास चालला.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना विनोद तावडे वादात सापडलेत. राष्ट्रीय राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या विनोद तावडे आरोपांच्या चक्रव्युहात सापडलेत. विरारमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. हा आरोप ज्या बहुजन विकास आघाडीनं केला त्या पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी ती टीप भाजप नेत्यानंच दिल्याचा दावा केलाय. भाजपमधील बहुजन चेहरा म्हणून विनोद तावडेंची ओळख आहे. झालेल्या प्रकाराबाबत विरोधकांनाही वेगळाच संशय आहे. तावडेंवर झालेल्या आरोपांच्या माध्यमातून बहुजनांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला जात नाही ना असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय.
विनोद तावडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या प्रचारात सक्रिय झाले होते. चर्चेत असलेला चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे ते सातत्य़ानं सांगत होते. त्यांच्या या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जात होता.
विनोद तावडेंच्या राजकीय कारकीर्दीला निवडणुकीनंतर कलाटणी मिळेल अशी चर्चा होती. पण त्याआधीच विरारच्या खिंडीत विनोद तावडेंवर आरोपांची चिखलफेक झालीये. वरवर पैसे वाटण्याचं साधं प्रकरण वाटत असलं तरी या घटनेचे दुरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय पंडितांकडून वर्तवण्यात येतेय.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर पैशांचे पाकिट वाटप करण्याचा आरोप करण्यात आलाय. यावरून बहूजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. या घटनेचे राजकीय नेत्यांमध्येही पडसाद उमटलेत. हे जॅकेट घातलेले आहेत विनोद तावडे. विनोद तावडे हे भाजपचे दिग्गज नेते. मात्र, भाजपच्या याच दिग्गज नेत्यावर पैशांचं पाकिटं वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. आणि याच आरोपावरून विरारमधील एका हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. राड्यानंतर 'बाटेंगे तो पिटेंगे' असा इशाराच हितेंद्र ठाकुरांनी दिलाय.
आमच्या बॅगा तपासता त्यांच्या कोण तपासणार, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचा इशारा दिलाय. भाजपला पराभव जवळ दिसत असल्यानं महाराष्ट्रात अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानं विनोद तावडेंना अटक करण्याची मागणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलीय. विनोद तावडेंकडून हा प्रकार होणं हे धक्कादायक असून पैसा, दडपशाही याची निवडणूक आयोगानं दखल घेणं गरजेचं असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हणत घटनेचा निषेध केलाय..मात्र, विरोधकांनी विनोद तावडेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. तर बविआनं केलेले सर्व आरोप फेटाळलेत. विरारसारख्या भागात घडलेल्या या प्रकाराचे पडसाद महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये उमटलेत. हे खरं असलं तरी विनोद तावडेंवरील आरोपाचा फायदा घेत मतदानाआधीचं विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय.