Ganesh Chaturthi 2023: 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. बाप्पाचे घरोघरी आगमन होणार. बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशचतुर्थीच्यानिमित्ताने आज आपण गणेश पुराणाविषयी माहिती करुन घेणार आहोत. गणेश पुराणानुसार, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप व अत्याचार वाढतील तेव्हा गणपती बाप्पा कलियुगात नवीन अवतार धारण करुन मनुष्याला धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार घेतील. कलियुगात बाप्पा अवतार घेणार याचे माहात्म्य जाणून घेऊया.
सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी चार युगे आहेत. पहिल्या तीन युगात बाप्पाने भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतला व दुर्जनांचा नाश केला. सत्ययुगात बाप्पाने महोत्कट विनायक या नावाने जन्म घेतला होता. देवातंक आणि नरांतक या राक्षसांच्या वधासाठी बाप्पाने अवतार धारण केला होता. त्रेतायुगात मयुरेश्वर या नावाने बाप्पाने अवतार धारण करुन सिंधू नावाच्या राक्षसाचा नाश केला. त्याचबरोबर ब्रह्मदेव कन्या रिद्धी, सिद्धी यांच्याशी लग्न केले. द्वापार युगात, बाप्पाने सिंदुरासुराचा वध करण्यासासाठी जन्म घेतला, अशी धार्मिक मान्यता आहे. आता हे कलियुग सुरू आहे. कलियुगातची बाप्पा जन्म घेणार असल्याची नोंद गणेश पुराणात आढळते.
गणेश पुराणानुसार, जेव्हा लोक लालची होऊन दुसऱ्यांची फसवणूक करतील. लोक स्त्रियांवर अत्याचार करतील. बलाढ्य लोक दुर्बलांना फसवतील तेव्हा हा अन्याय दूर करण्यासाठी बाप्पा अवतार घेतील. कलियुगात लोक धर्माचा मार्ग सोडून अधर्म करतील. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दैत्यांचे पूजन करतील तेव्हा ही वाईट कर्मे संपवण्यासाठी गणपती बाप्पा पुन्हा जन्म घेतील, अशी नोंद गणेशपुराणात आढळते.
गणेश पुराणात उल्लेख केल्यानुसार कलियुगात बाप्पा धूम्रकेतू या नावाने अवतार घेणार आहेत. समाजातील पसरलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी लोकांना सद्बुद्धी देण्यासाठी बाप्पा अवतार घेणार असल्याची नोंद गणेशपुराणात आढळते. बाप्पा जेव्हा अवतार घेतील तेव्हा त्यांचे वाहन नीळ्या रंगाचा घोडा असेल. कलियुगाच्या अंतापर्यंत चतुर्भुज स्वरुपात गणपती बाप्पा भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)