Devshayani Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी; जाणून घ्या या दिवसाचं मुहूर्त आणि महत्त्व

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं.

Updated: Jul 10, 2022, 09:26 AM IST
Devshayani Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी; जाणून घ्या या दिवसाचं मुहूर्त आणि महत्त्व title=

मुंबई : हिंदू धर्मात सण-उत्सवाला महत्त्व आहे. त्यात देवशयनी एकादशीला 2022 विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंचांगानुसार दर महिन्यात दोन याप्रमाणे वर्षभरात चोवीस एकादशी येतात. तर अधिक महिना असलेल्या वर्षात 26 एकादशी असतात. वेगवेगळ्या नावाने या एकादशी ओळखल्या जातात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं.

देवशयनी एकादशी मुहूर्त

देवशयनी एकादशीला 9 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजून 39 मिनिटांनी प्रारंभ झाला आहे. तर 10 जुलै 2022 रोजी दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी एकादशी समाप्त होईल. उदय तिथीनुसार एकादशी 10 जुलै रोजी साजरी केली जाईल.

पौराणिक मान्यता

आजच्या दिवशी भगवान विष्णू यांनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात पाठवलं होतं. यावेळी त्याच्या राज्याचं रक्षण करण्याचं वचन ही भगवान विष्णू यांनी दिलं. त्यानुसार बळी राजाच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू आषाढी ते कार्तिकी एकादशी या कालावधीत द्वारपाल म्हणून पाताळात जातात अशी मान्यता आहे.

चातुर्मास प्रारंभ

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास राहणार आहे. या काळामध्ये शुभ कार्य करू नये असं मानलं जातं.

शुभ कार्य का टाळावी?

चातुर्मासाच्या काळात मान्सून अधिक प्रमाणात सक्रिय असतो. या काळात सूर्य आणि चंद्राचं तेज क्षीण होत जातं. शिवाय यावेळी अग्नीची गतीही कमी होते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. त्यामुळे व्यक्तीची ऊर्जा कमी होते. त्यानुसार या कालावधीत शुभ कार्य करू नये असं मानलं जातं.