Aja Ekadashi 2024: अजा एकादशीचं व्रत 28 की 29 ऑगस्ट? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

Aja Ekadashi 2024: हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व दिलेले आहे. फार पूर्वीपासून या दिवशी भगवान विष्णूंसाठी व्रत करण्याची परंपरा चालत आली आहे. 

Updated: Aug 24, 2024, 02:27 PM IST
Aja Ekadashi 2024: अजा एकादशीचं व्रत 28 की 29 ऑगस्ट? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व title=

Aja Ekadashi Date 2024 : ही एकादशी भगवान विष्णूची सर्वात आवडती एकादशी मानली जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. म्हणजे संपूर्ण वर्षातून एकादशीचे व्रत 24 दिवस पाळले जाते. 

अजा एकादशी 2024 मुहूर्त- 
या वर्षी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1:19 वाजता अजा एकादशी तिथी सुरू होईल आणि 29 ऑगस्ट रोजी पहाटे 1:37 वाजता समाप्त होईल. त्यामुळे अजा एकादशीचे व्रत 29 ऑगस्टलाच करणे वैध असेल. कारण धर्म शास्त्रात फक्त उदय तिथीच योग्य मानली गेली आहे. अजा एकादशीसोबतच 29 ऑगस्टला सर्वार्थ सिद्धी योगही असणार आहे.

अजा एकादशीचे महत्त्व-
हिंदू कॅलेंडरनुसार, अजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते. भगवान श्रीकृष्णाने अजा एकादशीची माहिती युधिष्ठिराला दिली होती. या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्याने मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. अजा एकादशीला स्नान आणि दानाचेही विशेष महत्त्व मानले जाते.

अजा एकादशी पूजा विधी-
अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंग ठेऊन त्यावर पिवळे कापड पसरवावे. भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून कलश ठेवावा. यानंतर भगवान विष्णूला पिवळी फुले, सुपारी, नारळ, फळे या गोष्टी अर्पण करून आरती करावी. 108 वेळा 'ओम अच्युते नमः' या मंत्राचा जप करावा. दिवसभर व्रत हे करावे. संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून अजा एकादशीची व्रत कथा ऐकावी. त्यानंतर फलाहार करावा. 

अजा एकादशीला घ्यायची खबरदारी-
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. अजा एकादशीला घरामध्ये शक्यतो कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये. एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि शक्य झाल्यास भगवान विष्णूचे ध्यान करा. याशिवाय तुम्ही 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करू शकता. अजा एकादशीच्या दिवशी वादापासून दूर राहा. अजा एकादशीच्या पूर्वसंध्येला हलके आणि सात्विक अन्न खावे ज्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही सक्रिय राहू शकाल.

एकादशीचे व्रत सोडताना हे लक्षात ठेवा-
प्रत्येक एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला सोडणे योग्य मानले जाते. पारणापूर्वी तुम्ही भगवान विष्णूची पूजा करावी. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन त्यानंतर आवळा, खीर वगैरे खाऊन उपवास सोडू शकता.  

ज्योतिषांच्या मतानुसार तुम्ही अजा एकादशीच्या दिवशी, “उपेंद्राय नमः, ओम नमो नारायणाय मंगलम् भगवान विष्णू, मंगलम गरुध्वज. मंगलम् पुंडरीकाक्ष, मंगलय तनोहरिः।” या मंत्राचा जप करावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)