राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंतांच्या घराबाहेर सोडले खेकडे

दुरुस्तीचे काम निकृष्ट झाले होते का, असे विचारले असता जे काही शक्य होतं ते सगळं करण्यात आलं होतं, असे सावंत यांनी सांगितले.

Updated: Jul 9, 2019, 04:03 PM IST
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंतांच्या घराबाहेर सोडले खेकडे title=

पुणे: तिवरे धरणफुटीसाठी खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा करणारे राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे सोडले. तसेच काही कार्यकर्त्यांनी खेकड्याचा मुखवटा लावून 'माझा गुन्हा काय?', असा मजकूर असलेले फलक परिधान केले होते. 
 
रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे ३ जुलै रोजी फुटले होते. धरण फुटल्यानंतर त्यातील भराव १२५ ते १५० मीटर पर्यंत वाहून गेला. यामुळे तिवरे गावातील १३ घरे वाहुन गेली होती. गावातील २४ जण बेपत्ता आहेत. यापैकी २० जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. 

 या घटनेनंतर राज्यभरात सरकाविरोधात रोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नव्हे तर खेकड्यांमुळे फुटले, असा दावा केला होता.
 पत्रकारांनी त्यांना तिवरे धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते का, असा सवाल विचारला. त्यावर तानाजी सावंत यांनी म्हटले की, तिवरे धरण २००४ साली कार्यान्वित झाले. यानंतर १५ वर्षे सातत्याने धरणात पाणी साठत होते. हे धरण कोरडे पडले आणि त्याला तडे गेले, असा प्रकार एकदाही घडलेला नाही. गावकऱ्यांनी दाखवल्याप्रमाणे गळती होत असलेल्या ठिकाणांची डागडुजीही करण्यात आली होती. त्यामुळे धरण फुटण्यासाठी खेकड्यांचा मोठ्याप्रमाणवर झालेला प्रादुर्भाव हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी म्हटले होते.  त्यांच्या या हास्यास्पद विधानामुळे शिवसेना-भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे.