नव्या संसद भवन इमारतीचं काम पूर्ण, PM मोदी 'या' तारखेला करणार लोकार्पण

New Parliament Building : ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं दिल्लीतील संसद भवन आता इतिहासजमा होणार आहे. या संसद भवनजवळ बांधण्यात आलेली नवी संसद इमारत (New Parliament) आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. या इमारतीचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे. 

राजीव कासले | May 18, 2023, 22:54 PM IST
1/6

नव्या संसद भवन इमारतीचं बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं लोकार्पण केलं जाणार आहे. संसद भवनाचं काम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ लोकार्पण करण्याची विनंती केली.

2/6

लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी नव्या संसद भवानासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

3/6

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं मंदिर आणि देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब आहे. आता असलेल्या जुन्या संसद भवनपेक्षा नवं संसद भवन तब्बल 1700 चौरस मीटर मोठे आहे. एकूण 64,500 चौरस मीटर जागेत ही इमारत उभारण्यात आली आहे. नव्या संसद भवनात अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 

4/6

नव्या संसद भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. यात मार्शलना नवा ड्रेस कोड असणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवन इमारतीच्या बांधकामाची पाहाणी केली होती. बांधकाम करणाऱ्या मजुरांशीही पंतप्रधान यांनी बताचित केली होती. 

5/6

जुन्या संसद भवनात लोकसभेचे 550 आणि राज्यसभेचे 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. तर भविष्यातील परिस्थिती पाहात नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेच्या 384 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संसद सदस्यांसाठी लाऊंज, पुस्तकालय, भोजन क्षेत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था करुन देण्यात आली आहे. 

6/6

नव्या संसद भवन इमारतीच्या बांधकामांच कंत्राट टाटा प्रोजेक्टला सप्टेंबर 2020 मध्ये देण्यात आलं होतं. या इमारतीच्या बांधकामासाठी 861 कोटींचा खर्च नियोजीत करण्यात आला होता. काही अतिरिक्त कामांमुळे या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण 1200 करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत.