महाराष्ट्रातील 'या' गावाला लाभलाय निसर्गाचा चमत्कार, आशियातील सर्वात मोठं कुंड जिथे कितीही दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही

अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक अन् तिन्ही ऋतूमध्ये निसर्गाचे वेगवेगळे सौंदर्य महाराष्ट्रातील या गावात पाहिला मिळतो. निसर्गाची चमत्कारिक कलाकृती महाराष्ट्रातील निघोज गावात अनुभवता येतं. 

नेहा चौधरी | Aug 13, 2024, 15:56 PM IST
1/7

नदीचा रोरावता प्रवाह, पाण्याचा दाब आणि वातावरण यांचा परिणाम होऊन नदीपात्रात तयार झालेले रांजणखळगे हा निसर्गाचा एक चमत्कार महाराष्ट्रात पाहिला मिळतो. तसे अनेक ठिकाणी रांजणखळगे आहेत; पण नगर जिल्ह्यातल्या निघोजमधील रांजणखळगे आशियातील सर्वात मोठं कुंड आहे. 

2/7

कुकडी नदीच्या काठावर वसलेलं निघोज गाव पारनेर तालुक्यातलं एक टुमदार ठिकाण असून गावाचं ग्रामदैवत मळगंगा देवीचं मंदिर आहे. संपूर्ण मंदिराचं काम संगमरवरात करण्यात आलंय. 

3/7

याच देवळापासून तीन किलोमीटर अंतरावर कुकडी नदीमध्ये निसर्गाचा चमत्कार पाहिला मिळतो. पावसाळ्यात हा परिसर आणखी देखणा दिसतो. निसर्गानं हिरवेपण पांघरलेलं असतं. छान गारेगार वातावरण आणि त्यात कुकडी नदीचं पात्र सौंदर्य डोळ्यांचं पारणं फिटतं.

4/7

200 मि. लांब आणि 60 मि. रुंद अशा भागात निसर्गाचा हा अनोखा खेळ पाहायला मिळतो. अनेक रांजणखळग्यांमुळे या भागात चित्तवेधक शिल्पकला साकारलीय. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांबपर्यंत पसरलेलंय.

5/7

रांजणखळग्यांतून खळाळणारं पाणी, त्याची वेगवेगळ्या खळग्यांशी चालणारी मस्ती, हा खेळ प्रत्येकाने अनुभवण्यासारखा नक्कीच आहे. मोठ्या आकाराची खळगी वयस्कर आजोबांसारखी शांत, संयमी वाटतात तर छोटी जरा अल्लड, खोडकर भासतात. 

6/7

पावसाळ्यात काही ठिकाणी उंचावरून पडणारे छोटेछोटे धबधबेही मन मोहून घेतात. कमी उंचीच्या खळग्यांतून वर उडणारे तुषार पाहणाऱ्यांना मनसोक्त मनं बेभान करतात. 

7/7

हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाछी पुण्याहून अंतर सुमारे 90 किलोमीटर आहे. शिरूरच्या पुढे निघोजला जाण्यासाठी फाटा आहे. शिवाय शिक्रापूरहूनही जाता येतं.