मुंबई: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान मंदिर तीन दिवस उघडे असते. मात्र, यावेळी चंद्रग्रहणामुळे नेहमीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
आज सकाळी पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या पोथीची आणि फोटोची मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली. सगळी शिर्डी फुलांनी सजली होती. मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या आरतीनंतर मंदिर बंद होईल. शुक्रवारी काकड आरतीनंतर मंदिर उघडेल. त्यानंतर पुन्हा रात्री साडेदहा वाजता बंद होईल. शनिवारी काकड आरतीसाठी मंदिर पुन्हा उघडले जाईल.
गुरूपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक आणि पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. त्या सगळ्या भाविकांची राहण्याची आणि भोजनाची सोय मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.