www.24taas.com,
प्रकाश दांडगे, झी मीडिया
पत्रकाराच्या वाटयाला जे आयुष्य येतं ते विविधरंगी असतं... कधी तो एखादया साध्या नाका कामगारासोबत गप्पा मारत टपरीवर चहा पित असतो तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात साक्षात राष्ट्रपतींसोबत तो चहापानाच्या समारंभाला हजेरी लावत असतो. पत्रकाराच्या वाटयाला येणारं असं कलंदर आयुष्य डोळसपणे पहात त्यातली संगती-विसंगती टिपत त्यावर खमंग भाष्य करणारे कलंदर पत्रकार म्हणजे अशोक जैन...
अशोक जैनांच्या लेखणीत जादू होती... वाचनियता आणि विश्वासार्हता हा त्यातला विशेष गुण... मुळचे घोडेगावचे अशोक जैन... शिक्षणासाठी पुण्यात आले... मग सकाळमध्ये बातमीदारी... नंतर थोडा काळ तरुण भारतमध्ये... नंतर १९६६ ला महाराष्ट्र टाईम्समध्ये दाखल झाल्यानंतर ते इथे अखेरपर्यंत रमले... काही काळ मुंबई आणि नंतर नवी दिल्ली... १९८० ते १९९० च्या काळात घडलेल्या राजकीय घडोमोडीं त्यांनी विशेष प्रतिनिधी म्हणून टिपल्या... नंतर ते महाराष्ट्र टाईम्समध्येच सहसंपादक आणि तर कार्यकारी संपादक झाले. रविवार पुरवणीचं रुप त्यांनी पालटून टाकलं. नवे लेखक नवी सदरे.. आकर्षक लेआऊट... अशोक जैनाचं कानोकानी सदर तर प्रचंड लोकप्रिय होतं. `कलंदर` या टोपणनावाने ते लिहित असले तरी कलंदर म्हणजे अशोक जैनच हे सगळ्यांना माहित होतं...
कानोकानी, आणखी कानोकानी, सोंग आणि ढोंग, राजधानीतून अशी त्यांची वृत्तपत्रीय लिखाणातून साकारलेली पुस्तक गाजली... जैन यांची दुसरी ओळख म्हणजे एक समर्थ भाषांतरकार अशी होती... ओघवत्या मराठीत त्यांनी पुपुल जयकर यांच्या इंदिरा गांधींच्या चरित्राचं भाषांतर केलं... पी. सी अलेक्झांडर, नरसिंह राव, हरीष भिमानी, आर. के. लक्ष्मण, आर. के. नारायणस अरुण गांधी यांच्या पुस्तकांचे त्यांनी भाषांतर केलं आणि ते वाचकप्रिय ठरलं... ग्रंथालीच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता.
त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट म्हणजे खुसखुशित असतांनाही जपलेला नेमकेपणा... प्रत्यक्ष भेटीतही अशोक जैन लिखाणाप्रमाणेच दिलखुलास आणि मिश्किल असल्याची खात्री पटत असे... दाढीधारी चेहऱ्यावर चष्मा आणि त्यातून लुकलुकणारे डोळ्यांनी ते प्रेमळपणे तुमच्याकडे पहात आणि मुक्तपणे हसत...
त्यांच्या लेखनातून धमाल किस्सेही असत... राजीव गांधींची त्यांची खास ओळख होती. संसदेच्या बाहेर पडतांना ते राजीव गांधींना कसे गाठत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी बातमी ते कशी मिळवत हे त्यांनी बहारदारपणे लिहिलं आहे. शरद पवारांचीही त्यांची वैयक्तिक मैत्री होती. शरद पवार त्यांच्या घरी येत आणि मैफिली जमवत... अर्थात राजकारणी शरद पवार आणि मित्र शरद पवार ही दोन वेगळी व्यक्तिमत्व होती, हे अशोक जैन आवर्जून नमूद करत.
खुशवंत सिंग, ओशो रजनिश, शरद पवार, राजीव गांधी, विठ्ठलराव गाडगीळ, नारायण दत्त तिवारी, चंद्रशेखर, इंदिरा गांधी अशी कितीतरी व्यक्तिमत्वं त्यांनी वेगळ्यापद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवली.
राजकारणातल्या घबडग्यातही त्यांनी आपली रसिकता जपली होती. कविता त्यांना खूप आवडत असे... ना. धों. महानोर यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री होती. महानोरांच्या गावी पळसखेडयालाही ते जात आणि शेतीत, झाडा फुलांमध्ये रमत... अश्विन मेहता या निसर्गाची विविध रुप न्याहाळणाऱ्या छायाचित्रकाराचा त्यांनी एकदा रसाळपणे परियच मराठी वाचकांना करुन दिला होता.
दिल्लीच्या असताना अनेक लेखक पत्रकार त्यांच्या घरी उतरत. त्यांच्याही आठवणी त्यांनी लिहिल्यात... त्यांच्या मुली क्षिप्रा आणि बिल्वा आलेल्या पाहुण्यांवर आपलं मत देत... त्याही वाचण्यासारख्या असत. लेखक अनिल अवचट यांनी ओरिगामीची कला मुलींना दाखवली. टुन्न उडी मारणारा रुमालाचा उंदीर दाखवला, मुली खुश झाल्या... पण विख्यात संपादक गोविंद तळवलकर मात्र मुलींशी बोलले नाहीत.. त्यांच्या नव्या फ्रॉकबद्दल काहीच मत दिलं नाही... अर्थातच मुलींना हा पाहुणा फारसा आवडला नाही... पत्नी सुनीता यांच्या हातचं पिठलं भाकरी खाण्यासाठी कितीतरी दिग्गज अशोक जैनांच्या घरी उतरत... हा सगळा अनुभव जैन लिहीत आणि वाचकांनाही हा वेगळा अनुभव आवडत असे.
शेवटी लेखक-पत्रकार जातो तेव्हा काय उरतं... काही कॉलम बातमी आणि कागदावरची अक्षरं...
अशोक जैन प्रदीर्घ आजारानंतर गेले. पण, मागे उरलीत त्यांची पुस्तकं आणि वाचकांना आठवणारी त्यांची बातमीपत्रं...
अशोक जैन अशी बायलाईन आता यापुढे मात्र येणार नाही...