मुंबई : मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटण ठेवणे सरकारने बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून विक्री करण्यात येणाऱ्या सर्व मोबाईलमध्ये पॅनिक बटन देणे आवश्यक झालं आहे.
या बटणाच्या आधारे संकटकाळी मदतीसाठी तातडीने कॉलद्वारे मदत मिळविता येणे शक्य होणार आहे. दूरसंचार विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे याबाबत सूचना देण्यात आली आहे. पॅनिक बटण हे महिलांना अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
1 जानेवारी 2018 पासून जीपीएस सुविधा ही फोनमध्येच उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीपीएसच्या सुविधेमुळे संकटात असलेल्या व्यक्तीचे नेमके ठिकाण कळणे शक्य होणार आहे.
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे, 'तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक चांगले होणार आहे. या माध्यमातून महिलांना चांगली सुरक्षा देता येऊ शकते'.